नागपूर : उष्ण हवामानाचा परिणाम पक्ष्यांच्या प्रजननक्रियेवर होत असून पिल्लांना जन्म देण्याचे प्रमाण कमी होत आहे. प्रामुख्याने ‘साँगबर्ड’ या प्रजातीतील जे पक्षी आहेत, त्यांची संख्या सुमारे १२ टक्क्यांनी कमी होऊ शकते. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस (यूसीएलए) आणि मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलामुळे पक्ष्यांना प्रजननाचा नैसर्गिक वेग राखता येत नाही. हा अभ्यास ‘प्रोसििडग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. पक्ष्यांसाठी त्यांची पिले वाढवण्याची वेळ महत्त्वाची असते. खूप उशिरा किंवा खूप लवकर प्रजनन करताना हवामानातील बदल त्यांच्या अंडी किंवा नवजात पिलांना हानी पोहचवू शकतात. अन्नस्त्रोतांच्या संदर्भात देखील वेळ महत्त्वाची आहे. ते नैसर्गिकरित्या उपलब्ध होत नसेल तर पक्ष्यांकडे त्यांची पिल्ले जिवंत ठेवण्यासाठी दुसरी कोणतीही संसाधने नाहीत. या अभ्यासात संशोधकांनी २००१ ते २०१८ दरम्यान संपूर्ण उत्तर अमेरिकेतील वनक्षेत्राजवळील १७९ ठिकाणी ४१ स्थलांतरित आणि रहिवासी पक्ष्यांच्या प्रजातींसाठी प्रजननाची वेळ तसेच तरुण पक्ष्यांची संख्या मोजली. त्यानंतर उपग्रह प्रतिमेचा वापर करुन प्रत्येक अधिवासाभोवती वनस्पती कधी उगवतात याचेही निरीक्षण केले. यावेळी शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, वसंत ऋतू सुरू होण्याचे संकेत मिळताच ही प्रजाती केवळ एक दिवस आधी प्रजनन करते.
ठोस धोरण निर्धारित करण्याची गरज १९७०च्या दशकापासून उत्तर अमेरिकेने पक्ष्यांच्या एकूण संख्येपैकी सुमारे एक तृतीयांश पक्षी गमावले आहेत, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे हवामान बदलाचे आणखी वाईट परिणाम होण्याआधी पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी ठोस धोरण निर्धारित करावे लागेल, याकडेही या अभ्यासाच्या अखेरीस लक्ष वेधण्यात आले आहे.