नागपूर : ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे हवामानात प्रचंड बदल होत असून आठवड्याच्या उत्तरार्धात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे.
देशभरात सर्वच ठिकाणी हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही कमी गेला होता. त्यामुळे आता तरी कडाक्याची थंडी अनुभवायला मिळणार असे वाटत असताना हवामानात पुन्हा एकदा बदल घडून आलेत. पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर अनेक ठिकाणी असली तरी ढगाळ हवामानदेखील राज्यात दिसून येत आहे. त्यामुळे पहाटे व रात्री साधारण थंडी तर दिवसा मात्र उकाडा आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. पुण्यातदेखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातील नागपूरसह काही अशा एकूण २२ जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे.