लोकसत्ता टीम
बुलढाणा: चालू वर्षात तीन आंदोलने करूनही शासन- प्रशासन काहीच दखल घेत नसल्याने वंचित बहुजन आघाडीने आंदोलन एकदम ‘उंचीवर’ नेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या युवा आघाडीने २८ ऑगस्टला स्थानिय ‘बीएसएनएल’च्या टॉवरवर चढून आंदोलन करण्याची घोषणा केली!
येत्या २९ ऑगस्ट रोजी बुलढाण्यात ‘शासन आपल्या दारी’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्री हजर राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासन, सर्व यंत्रणा,पोलीस विभाग कमालीचे व्यस्त आहे. यातच जिल्हाधिकारी तुम्मोड यांची बदली झाल्याने पदाचा प्रभार व कार्यक्रमाचा भार जिल्हापरिषदेच्या ‘सीईओ’ भाग्यश्री विसपुते यांच्या वर आहे. या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी ‘टॉवर चढो’ आंदोलन जाहीर करून वंचित युवा आघाडीने प्रशासनाची गोची केली आहे.
आणखी वाचा-वर्धा : जिल्ह्यातील विकास कामे संथ गतीने, खासदार तडस यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले
काय आहे मागण्या?
स्पर्धा परीक्षांचे अवाजवी शुल्क माफ करावे, पसंतीक्रमाप्रमाणे परीक्षा केंद्र देण्यात यावे, पारदर्शकता व पेपर फुट टाळण्यासाठी सर्वच स्पर्धा परीक्षा घेण्याचे अधिकार महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाला देण्यात यावे, या आघाडीच्या मुख्य मागण्या आहे. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सतिश पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने, बिरबल की खिचडी आंदोलन तसेच १४ ऑगस्ट रोजी विराट मोर्चाही काढण्यात आला.
मात्र, या जिव्हाळ्याच्या मागण्यांबाबत शासन, प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जातीसमूहातील मुलांना गुणवत्ता असतानादेखील न्याय मिळत नाही. यामुळे टॉवर आंदोलन करण्यात येणार आहे.