नागपूर : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काही राज्यांमध्ये दंगलसदृश्य स्थिती असली तरी महाराष्ट्रात पोलिसांनी शांतता कायम ठेवली. यापूर्वी दंगल घडवणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर पोलिसांची नजर आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यातील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेसह अन्य काही संघटनांच्या हालचालींवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मागील काही महिन्यांत पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या हिंसक घटनांमध्ये मोठी घट झाली. ते छत्तीसगडमध्ये गेले. तेथील पोलिसांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, असे पाटील म्हणाले.

तंटामुक्त गाव योजनेचे अध्यक्षपद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असून लवकरच ही योजना पुनर्जीवित करण्यात येणार आहे, नागपुरातील मध्यवर्ती कारागृह हलवण्याचा प्रस्ताव नितीन गडकरी यांनी दिला होता. त्यावर विचार सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

कारागृहातील गैरप्रकाराची चौकशी

कारागृहातील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी मध्यवर्ती कारागृहात पाठवून चौकशी करण्यात येणार आहे,एका कराटे शिकवणाऱ्या प्रशिक्षकाने सात मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कन्हानमध्ये उघडकीस आली. अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा त्वरित तपास करून जलदगती न्यायालयात सुनावणी करण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

शक्ती कायदा प्रस्ताव परत

शक्ती कायदा लागू करण्याचा प्रस्ताव राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, त्यात काही त्रुटी असल्याने तो परत आला आहे. त्रुटी दुरुस्त करून पुन्हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाईल, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

Story img Loader