मुसळधार पावसाने संपूर्ण विदर्भात रविवारपासून ठाण मांडले असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यात कोलाड नदीच्या पुराचे पाणी गावात शिरले असून धोत्रा गावातील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. तर भंडारा जिल्ह्यात पाऊळदवणा ते बेला मार्ग तसेच लाखांदूरकडे जाणारा मार्ग पावसामुळे बंद झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील काही रस्ते पुरामुळे बंद झाले आहेत.गडचिरोली जिल्ह्यात भामरागड संपर्क तुटला आहे.
परतीच्या पावसाने नागपूर सह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्लु जवळील काही वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे. तर मिहानचा मार्ग जलमय झाला आहे. चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. अमरावती जिल्ह्यातील नद्या दुथडीभरून वाहत आहेत.
हेही वाचा : गडचिरोलीत पूरस्थिती; भामरागडचा संपर्क तुटला, ८ मार्ग बंद
वाशीम जिल्ह्यात मानोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा, लोअरपुस, अडाण, सायखेडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अडाण नदी दुथडी भरून वाहत असून बोरिअरब येथील पुलावरून पाणी असल्याने यवतमाळ-दारव्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.