चंद्रपूर : मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासून ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने संपूर्ण ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशातच उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची ११ व्या दिवशी प्रकृती खालावली आहे. टोंगेंच्या जिवाचे वाईट झाल्यास संपूर्ण राज्यात उद्रेक होईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे. मुसळधार पावसातही आंदोलन सुरू.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे ११ दिवसांपासून अन्नपाणी त्यागून उपोषण करीत आहेत. आतापर्यंत वनमंत्री मुनगंटीवार वगळता सरकारमधील एकाही मंत्र्याने त्यांची भेट घेतली नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाचे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला भेट दिली. उपोषण मंडपात आरोग्य सेवा व इतर सुविधा पुरवल्या. राज्य सरकारचे चार मंत्री दररोज जरांगे यांची भेट घेत होते. मुख्यमंत्री आले तर उपोषण मागे घेऊ, असे जरांगे पाटील यांनी सांगताच मुख्यमंत्री लगेच उपोषण सोडवायला गेले. मात्र येथे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी रवींद्र टोंगे ११ दिवसांपासून अन्नपाणी त्याग करून आंदोलन करीत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी साधा फोन करून त्यांची चौकशीदेखील केली नाही. त्यामुळे ओबीसी समाजात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याप्रति तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा – भद्रावतीच्या कन्येच्या प्रश्नाने केंद्रीय विदेशमंत्री भारावले
हेही वाचा – अट्टल पण छुपा मद्यपी कसा असतो? लक्षणे व उपचार काय? वाचा सविस्तर…
आज उपोषणाच्या ११ व्या दिवशी टोंगे यांची प्रकृती खालावली. त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. त्यांच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास राज्यात उद्रेक होईल. या उद्रेकाची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार यांची राहील, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे.