चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत भारताला कुष्ठरोग मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. या कार्यात बाबा आमटे यांच्या संस्थेचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. त्यामुळे आनंदवनाच्या महारोगी सेवा समितीला सहभागी करून घेतले जाईल तसेच संस्थेला ७५ कोटींचे आर्थिक पाठबळही उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समिती आनंदवनच्या ७५ व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी राज्यपाल राम नाईक, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, करण देवतळे, महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आदी मान्यवर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री म्हणाले, अतिशय कठीण काळात बाबा आमटेंनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. समाजामध्ये ज्या कामाला मान्यता नव्हती, अशा स्थितीत बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत हाती घेतले. आज ७५ वर्षानंतर अनेक प्रतिष्ठित लोक या संस्थेची जुळले आहेत. या सर्व लोकांना आनंदवनातून आत्मिक समाधान मिळत असते. त्यामुळेच आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे.

७५ वर्षाची वाटचाल अतिशय महत्त्वाची आहे. त्या काळात हा भाग अतिशय मागासलेला असताना बाबांनी हा प्रकल्प हाती घेतला. केवळ कुष्ठरोगांची सेवा नव्हे तर समाजसेवेची विविध क्षेत्रे जलसंधारण, पर्यावरण रक्षण असे अनेक प्रयोग येथे सुरू आहेत. आनंदवनच्या सकारात्मक कामातून हजारो तरुणांना समाजासाठी उत्तरदायित्व केले आहे. आपले संपूर्ण जीवन आमटे कुटुंबियांनी या प्रकल्पासाठी समर्पित केले आहे. अनेक अडचणींचा सामना आनंदवनला करावा लागत असला तरी विचलित न होता आनंदवनचे काम निरंतर सुरू आहे. विविध क्षेत्रातील लोक या संस्थेसोबत जुळले आहे. यात कला, संगीत, फिल्म, उद्योग आदींचा समावेश आहे. मूलभूत सेवेचा उत्कृष्ट नमुना आनंदवनात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा पंतप्रधानांचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०२७ पर्यंत कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा संकल्प आहे. या कामासाठी शासनाला आनंदवन सारख्या संस्थांची मोलाची मदत घ्यावी लागणार आहे. सन २०१५ मध्ये भारतात प्रति लक्ष ९.७३ कुष्ठरुग्ण सापडायचे. आज प्रती लक्ष ५.५२ रुग्ण आढळतात. त्यामुळे आपल्याला मोठे काम करावे लागेल. यात आनंदवनचा मोठा सहभाग राहील.

आनंदवनच्या अनुदानात वाढ

आनंदवन येथे कौशल्य विकास केंद्र उभे राहत आहे. तसेच निवासी ५०० लोकांचे केंद्र सुद्धा येथे सुरू होणार आहे. २०१२ पासून आनंदवनला देण्यात येणाऱ्या अनुदानात आता बदल करण्यात येत असून प्रति रुग्ण २२०० ऐवजी आता ६ हजार रुपये तर पुनर्वसन अनुदान अंतर्गत प्रति रुग्ण २ हजार वरून ६ हजार रुपये देण्यात येणर आहे. आनंदवनला १० कोटी रुपये कॉर्पस फंड लगेच देण्यात येईल. उर्वरित ६५ कोटी रुपये कॉर्पस फंड देण्याकरीता नक्कीच प्रयत्न करणार असून शासन म्हणून आम्ही यासाठी पुढाकार घेऊ. आनंदवन ही समाजाची संस्था आहे. सकारात्मक संस्थेच्या मागे उभे राहणे ही शासनाची जबाबदारी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

आनंदवनचा सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय : सामंत

आनंदवन येथे दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू होत असून उद्योगांशी त्याचा समन्वय करून देण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना नोकरी मिळण्यास मदत होईल. आनंदवन सारखे किमान २ टक्के काम, इतर ठिकाणी करू शकलो, तर ती बाबा आमटे यांना खरी श्रद्वांजली ठरेल. असे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले. बाबा आमटे यांच्या जीवनावर चित्रपट यावेळी बाबा आमटे यांच्या जीवनावर मराठी आणि इंग्रजीमध्ये भाषेवर आधारित चित्रपटाचे ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याशिवाय एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. (महारोगी सेवा समिती) ॲज हेल्थ कॅपिटल, सोमनाथ येथील श्रमतीर्थ, आनंदवनला डब्ल्यूसीएल कडून मिळालेल्या सोलर पॉवर जनरेशन प्रोजेक्ट, एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. ॲज स्कील डेव्हलपमेंट कॅपिटल आदींचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौस्तुभ आमटे यांनी केले. संचालन वसुंधरा काशीकर – भागवत यांनी तर आभार डॉ. दिगंत आमटे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.