यवतमाळ : गुन्ह्यांचा तपास, बंदोबस्त, मंत्र्यांचे दौरे, सुरक्षा व्यवस्था यात व्यस्त असणाऱ्या पोलीस दलास सामान्य माणसांचा विचार करायला वेळ मिळणे तसे कठीणच. परंतु, कर्तव्य बजावत असताना सामाजिक बांधिलकी जपत येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ‘ऑपरेशन प्रस्थान’सारख्या उपक्रमातून पोलीस – पब्लिक संबंध अधिक दृढ केले. त्यांच्या या कार्याची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून घेतली आणि सशक्त नारीशक्ती असा उल्लेख करत ‘वेल्डन यवतमाळ पोलीस’ अशी कौतुकाची थाप देत गौरव केला.
‘ऑपरेशन प्रस्थान’ उपक्रमांतर्गत यापूर्वी क्रीडा स्पर्धा, रोजगार मेळावा यशस्वी झाल्यानंतर सर्वसामान्य महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी जिल्ह्यातील महिला व तरूणींची सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी यवतमाळ पोलिसांनी पुढाकार घेतला. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून २१ व २२एप्रिल रोजी महिलांसाठी दोन दिवस निःशुल्क व निवासी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. यामध्ये जिल्हाभरातील २२८ महिला, मुलींनी सहभाग नोंदविला. अपर पोलीस महासंचालक अश्वती दोरजे यांच्या उपस्थितीत या शिबिराचा समारोप झाला. या शिबिरात केवळ स्वसरंक्षणाचेच धडेच मिळाले नाही तर, व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळाली, अशी प्रतिक्रिया सहभागी तरुणींनी दिली.
या सर्व उपक्रमांची राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एक्स- अकाऊंटवरून ‘वेल्डन यवतमाळ पोलीस’ अशा शब्दात कौतुक करत दाखल घेतली. थेट मुख्यमंत्र्यांनी कौतुक केल्याने यवतमाळ पोलीस दलास अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया पोलिसांमध्ये व्यक्त होत आहे. यवतमाळ पोलीस दलात या पद्धतीने सर्वसामान्य महिलांकरीता अशा प्रकारचे निवासी शिबीर पहिल्यांदाच झाले. जिल्ह्यात ‘ऑपरेशन प्रस्थान’ उपक्रमांतर्गत पोलिस आणि नागरिकांमधील संवाद वाढविण्यासाठी विविध प्रयोग सुरू आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करून आतापर्यंत सात हजार ५०० तरूणांनी यात सहभाग घेतला. तर साडेतीन हजार तरुणान विविध जिल्ह्यांत रोजगार मिळवून देण्यात पोलीस विभागाला यश आले आहे. तालुकास्तरावर विविध क्रीडा स्पर्धा या उपक्रमांतर्गत घेण्यात आल्या. त्यात गावखेड्यातील प्रतिभावान खेळाहूंना संधी मिळाली. यामध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी व क्रिकेट या स्पर्धा झाल्या.
काम करण्यास अधिक चालना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केल्याने कर्तव्यासोबतच सामाजिक उपक्रम राबविण्यास अधिक चालना मिळाली. तरुणांमध्ये प्रचंड विधायक ऊर्जा आहे, तिचा समाजात सकारात्मकरित्या वापर व्हावा, या हेतूने ऑपरेशन प्रस्थान उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून तरुणाईला योग्य दिशा मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे, असे पोलीस अधीक्षक कुमार चिंता म्हणाले.