लोकसत्ता टीम

नागपूर : रामनवमीनिमित्त नागपुरात निघालेल्या शोभायात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संविधानात रामाचे चित्र असल्याने संविधान हे रामराज्य आणण्याचे माध्यम असल्याचे वक्तव्य केले. बहुजन समाज पार्टीचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केवळ रामाचे नव्हेतर २२ महापुरुषांची चित्रे संविधानात आहे, असे नमूद करत फडणवीसांचा दावा खोडून काढला आहे.

भारतीय संविधानात एकूण २५२ पाने असून राम राज्याची संकल्पना मांडणाऱ्या राम व कृष्णाच्या भाग तीन व चार साठी फक्त ११ पाने असून बुद्ध व महावीर यांच्यासाठी ८४ पाने आहेत. संविधानातील संघ, कार्यपालिका, मंत्रीपरिषद असलेल्या पाचव्या भागात बुद्धाला स्थान दिले.

त्यासाठी ४६ पानांची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर संविधानाने बौद्ध अनुयायी असलेल्या सम्राट अशोकाचे सिम्बॉल अशोक स्तंभ स्वीकारला आहे. एवढेच नव्हे तर भारतीय संविधानाची प्रास्ताविका बुद्धीझमच्या समता, स्वातंत्रता, न्याय व बंधुता या मानवी मूल्यावर आधारित आहे. बुद्ध हे जागतिक लोकशाही गणराज्याचे संस्थापक आहेत. भारतीय संविधानाने सिंधू संस्कृती पासून सुरुवात केली, कारण ती मानव केंद्रित व समताधिष्ठित असल्याने व वैदिक संस्कृती ही देवधिष्ठित व विषमतेवर आधारित असल्याने याला जागा दिली नाही.

भारतीय संविधानाने मागील ७५ वर्षात कायद्याचे राज्य निर्माण केले आहे, हे प्रस्थापित संविधान विरोधकांना नको आहे. त्यांना भारतीय संविधान विरोधी रामराज्य हवे आहे. म्हणून राज्यकर्ते संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही शेवडे यांनी केला आहे.

राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, छत्रपती शिवाजी

संविधानाच्या २२ भागात २२ प्रकारची चित्रे अंकित केलेली आहेत. ज्यांचा देशाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. चित्रामध्ये राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, सम्राट अशोक, गंधर्व, राजा विक्रमादित्य, नालंदा, नटराज, राजा अकबर, छत्रपती शिवाजी, गुरु गोविंदसिंह, राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आदी राजे महाराजे व महापुरुषांची चित्रे वेगवेगळ्या भागात अंकित केलेली आहेत.

संविधान सभेत २३५ प्रतिनिधी व ८९ संस्थानिक असे ३२४ तज्ञ प्रतिनिधी होते, ज्यांच्या संविधानावर सह्या झालेल्या आहेत. त्यामुळे कोणीही अयऱ्या गयऱ्यांनी उठ सूट संविधानावर भाष्य करू नये. कारण संविधानाच्या शिल्पकारांनी जगातल्या सर्व संविधानांचा अभ्यास करून ही निर्मिती केलेली आहे ज्याला जगात तोड नाही.