लोकसत्ता टीम
नागपूर: राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान महायुतीच्या या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे. याचबरोबर या निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी योजनेचे पैसे २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. आता निवडणुकीनंतर राज्यातील महिला योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत.
अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बीड, परभणी मुद्यावर उत्तर देताना विविध विषयांना हात घातला. यावेळी त्यांनी लाडकी बहिण योजनेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या होत्या. या योजनांची पूर्तता करण्यासाठी ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १,४०० कोटी रुपये इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.
आणखी वाचा-तुरीच्या दरात आठवडाभरात ९०० रुपयांची घसरण
आमचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही नोव्हेंबरमध्येच डिसेंबरचे पैसे देऊ असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. तसेच, जाहीरनाम्यात वचन दिल्याप्रमाणे पात्र महिलांना दीड हजार रुपये न देता २१०० रुपये देऊ असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले होते. आता राज्यात सरकार स्थापन झाले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आहे. मात्र, असे असतानाही लाडकी बहिण योजनेसंदर्भात ठोस निर्णय झालेला नाही. डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतरही लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे सरकार ही योजना बंद पाडणार हा अशीही चर्चा रंगत होती. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.
कधीपासून मिळणार २१०० रुपये?
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० वरून २१०० रुपये करणार असे अश्वासन दिले होते. आता निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर २१०० रुपये कधीपासून मिळणार याची महिला वर्गात चर्चा सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना नक्की २१०० रुपये मिळणार असल्याचे सांगितले. निवडणुकीत जी आश्वासने दिली आहेत ती सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
आणखी वाचा-नितीन गडकरींना उच्च न्यायालयाकडून नोटीस, खासदारकी रद्द…
लाडकी बहिण योजनेतून कुणाचे नाव कापणार?
लाडकी बहिण योजनेमधून कुणाचेही नाव कापले जाणार नाही. समाजामध्ये काही चांगल्या आणि काही वाईट प्रवृत्ती असतात. काही महिलांनी तीन ते चार खाते तयार करून लाभ घेतला आहे. असे असल्यास त्यांच्यावर कुठेतरी निर्बंध आणणे आवश्यक आहे. मात्र, कुणाचेही नुकसान होणार नाही. आम्ही दिलेले प्रत्येक आश्वासन पाळू असेही मुख्यमंत्री म्हणाले.