गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चालू वर्षात सरसकट हेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर केले होते. यामुळे बोनस वाटपातील अनियमिततेवर आळा बसेल, अशी अपेक्षा होती. परंतु या प्रक्रियेतील अधिकारी आणि खरेदी-विक्री संघातील सदस्यांनी मिळून भूमिहीन व्यक्तींच्या खात्यावर प्रत्येकी ४० हजार रुपये जमा करून ते पैसे परस्पर काही खात्यांवर वळते केले. यामाध्यमातून एकट्या चामोर्शी तालुक्यात कोट्यवधींचा धान बोनस घोटाळा करण्यात आला, अशी तक्रार भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशीष पिपरे यांनी पुराव्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. उशिरा का होईना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले असून चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून धान खरेदी, भरडाई घोटाळा, तांदूळ तस्करी यासारख्या प्रकारामुळे शासनाला कोट्यवधींचा फटका बसत आहे. अशातच आता धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसमध्ये देखील कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतो आहे. सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशीष पिपरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या घोटाळ्या संबंधित दस्तऐवज सादर करून चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे खरेदी विक्री संघ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केल्या जात आहे.
पिपरे यांनी तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार, चामोर्शी तालुका खरेदी विक्री संघाने भूमिहीन व्यक्तींच्या नावे शेती दाखवून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी ४० हजार रुपये जमा केले. त्यानंतर संबंधित व्यक्तींना दोन ते तीन हजार देऊन उर्वरित रक्कम इतरत्र वळती करण्यात आली. याप्रकरणी काही बोगस लाभार्थ्यांचे खाते तपासले असता हा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारच्या बोगस लाभार्थ्यांची यादीच तक्रारीत देण्यात आलेली आहे. यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या घोटाळ्यात त्यांचा देखील सहभाग नकारता येत नाही. सदर प्रकार गंभीर असून या प्रकरणाची विशेष समितीमार्फत चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पिपरे यांनी केली होती. मात्र, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयी कुठलीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात तक्रार दाखल करताच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
घोटाळ्याची जिल्हाभर व्याप्ती
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे दरवर्षी खरेदी-विक्री संघामध्ये मोठी उलाढाल होत असते. हा केवळ चामोर्शी तालुक्याचा प्रश्न नसून या घोटाळ्याची व्याप्ती जिल्हाभर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य चौकशी झाल्यास यात अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गडचिरोली आणि चामोर्शी येथील काही राजकीय नेत्यांचा यात सहभाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.