गडचिरोली : नागपूर येथे उपाचार घेत असलेल्या अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील एका गरीब आदिवासी युवकाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातले आहे. ‘लोकसत्ता’ने यासंदर्भात शनिवारी वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे मुलाच्या उपचारासाठी पैशांअभावी तीन दिवसापासून उपाशी असलेल्या आई- वडिलांना आधार मिळाला आहे.
सुनील रमेश पुंगाटी (१७,रा. हितापाडी ता. भामरागड) असे त्या युवकाचे नाव. २५ जानेवारीला सुनील यास ताप आला,त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. ताप डोक्यात गेल्याने आजारी पडलेल्या सुनीलला घेऊन पिता रमेश रामा पुंगाटी नागपूरला गेले. मुलाला एका खासगी रुग्णालयात भरती केले. आतापर्यंत एक लाख रुपये उपचार खर्च आला. मुलाला वाचविण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्र मोडले व व्याजानेही पैसे घेतले, पण आणखी एक लाख रुपये जमा करा म्हणून रुग्णालय प्रशासनाने सांगितले. पैसे नसल्याने तीन दिवसांपासून हे दाम्पत्य उपाशी होते.
अशा परिस्थितीत पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. हतबल झालेल्या रमेश पुंगाटी यांनी मुलाला वाचविण्यासाठी ३१ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून साहेब, तुम्हीच आमचे पालक, माझ्या मुलाला वाचवा, अशी विनवणी केली. मुलाला घेऊन नागपूरमध्ये वणवण भटकत असताना काही दलालांनी या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला, तेथे स्वस्तात उपचार होतील, असे देखील सांगितले. प्रत्यक्षात कमी खर्चात उपचार होत नाहीत, असा उल्लेखही पत्रात करण्यात आला होता. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या चमुला तात्काळ मदतीचे निर्देश दिले. यामुळे आता सुनीलच्या उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
अनेकांकडून मदतीचा हात
मुलगा व्हेंटिलेटरवर आहे, तो वाचेल की नाही माहीत नाही, अशा काळीज हेलावणाऱ्या शब्दांत रमेश पुंगाटी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सध्या मुलावर उपचार सुरु असून आई- वडील त्याला वाचविण्यासाठी धडपडत आहेत. दरम्यान, वृत्तानंतर अनेकांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. असे रमेश पुंगाटी यांनी सांगितले.