वर्धा : राज्याचा राजा आला, आता विकास थांबणार नाही, असे नमूद करीत आमदार सुमित वानखेडे यांनी झालेली विकास कामे प्रथम प्रास्ताविकातून वाचली. सोबतच वाढीव मागण्या केल्या. ७२० कोटी रुपयाची कामे आधीच पदरात पडली आणि आता परत वाढीव निधीची अपेक्षा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारणही तसेच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास म्हणून ओळख असलेल्या आमदार सुमित वानखेडे यांच्या आर्वी मतदारसंघात असा निधीचा पाऊस पडतोय हे स्थानिक मतदारांना आनंद देणारे ठरले.
मात्र व्यासपीठावर उपस्थित काहींना हे खटकले. चुळबुळ सूरू झालीच. यापैकी एक असलेले आमदार समीर कुणावार हे बाजूलाच बसलेल्या पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांच्या कानात कुजबुजले. कां हो, चारच महिने झाले आमदार होऊन आणि एव्हढा भरमसाठ निधी. कमाल झाली. कुणावार यांचे हे बोल दोघांपूरतेच. मात्र ते उघड झालेच.
पालकमंत्री डॉ. भोयर हे भाषणास उठले आणि त्यांनी पण आर्वीत प्राप्त निधीचे कौतुक केले. त्यासाठी कर्तबगार व पाठपुरावा करणारा आमदार ( वानखेडे ) असतो असा गौरव केला. पुढे डॉ. भोयर यांनी खुलासा करतांना आमदार कुणावार यांनी केलेली टिपणी सांगितली. आणि मग डॉ. भोयर म्हणाले की समीर भाऊंना मी म्हणालो की वानखेडे हे आमदार होऊन चारच महिने झाले हे खरंच.
पण गत १५ वर्षांपासून ते ज्यांच्यासोबत ( देवेंद्र फडणवीस ) राहत आहे त्यांच्यापासून ते काम कसे करायचे हे चांगलेच शिकले आहे. अशी डॉ. भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या साक्षीने केलेली टिपणी प्रचंड हास्याची दाद देऊन गेली. खुद्द आमदार कुणावार हे पण मोठ्या मनाने त्यात सामील झाले. फडणवीस यांनीही स्मितहास्याची प्रतिक्रिया दिली.
पालकमंत्री आमदार वानखेडे यांच्याबाबत भरभरून बोलले. कारण प्रस्ताविक करतांना आमदार वानखेडे यांनी पण डॉ. भोयर यांच्या मोठ्या मनाची साक्ष दिली होती. पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा, आमचा पालक. ज्याच्याकडे हट्ट करावा व तो पूर्ण करून घ्यावा, असा हा पालकमंत्री. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी पालकमंत्री भोयर हे राजस्थानात होते. पण त्यांनी तेथून फोन करीत मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी काही अडचण असल्यास ते सांगा. कुठे कमी पडणार नाही. काही मदत लागल्यास विनासंकोच सांगा, असा धीर दिल्याचे आमदार वानखेडे यांनी जाहीरपणे म्हटले. भोयर – वानखेडे असे नवे मेतकूट तर जिल्ह्यात जमले नाही नां, अशी चर्चा राजकीय वर्तुळात मात्र सूरू झाली आहे.