वर्धा : गावात मुख्यमंत्री येणार म्हटले की सर्वांचीच उत्सुकता वाढते. त्यात तालुका पातळीवर खेडेवजा शहर असणाऱ्या गावात मुख्यमंत्र्यांचे येणे राजकीय वर्तुळात चर्चेचे ठरतेच. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, १३ एप्रिलला आर्वीत येत आहेत.

आमदार सुमित वानखेडे यांच्या आर्वी मतदारसंघात ते सकाळी ११ वाजता हजेरी लावणार आहेत. विधानसभा प्रचारात राज्यात सर्वात शेवटची सभा त्यांची आर्वीतच झाली होती. कारण उमेदवार सुमित वानखेडे यांच्यासाठी वाट्टेल ते अशी भूमिका त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. सुमित वानखेडे आमदार झाले. नित्य नव्या कामांचा मग सपाटाच सूरू झाला. आता त्यापैकी काही कामे पूर्ण झाली असून त्यांचे लोकार्पण व काही कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री करतील.

तळेगाव रस्त्यावर बांधण्यात आलेल्या भव्य प्रशासकीय भवनाचे लोकार्पण होणार. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर प्रामुख्याने उपस्थित असतील. तसेच कार्यक्रम पत्रिकेत खासदार अमर काळे यांचे पण नाव आहे. नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेले दादाराव केचे तसेच आमदार राजेश बकाने, समीर कुणावार, सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी पण निमंत्रित आहेत.

आर्वीला अनेक तपानंतर खासदार लाभला आहे. तसेच सुमित वानखेडे व दादाराव केचे असे दोन आमदार पण आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे एक नवे सत्ताकेंद्र म्हणून आर्वीची ओळख निर्माण होत आहे. प्रचारदरम्यान झालेल्या सभेत फडणवीस यांनी अमर काळे यांची चांगलीच हजेरी घेतली होती. आता हे दोघे एकाच व्यासपीठावर दिसणार कां, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

प्रशासकीय भवन लोकार्पण व अन्य कामे आहेत. त्यात गांधी विद्यालय व जलतरण तलाव लोकार्पण, उपजिल्हा रुग्णालय, उपसा सिंचन, नेरी सौरग्राम प्रकल्प, कारंजा तालुका रस्ते विकास व अन्य अशी ७२० कोटी रुपये किमतीची विकास कामे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मार्गी लागतील. वानखेडे आमदार असल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त आर्वी मतदारसंघावर राहणार, असे बोलल्या जाते.