नागपूर: उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून राज्यात सरकार स्थापन केले. यावेळी भाजपच्या सर्वाधिक जागा होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होणार असा सर्वांचा अंदाज होता. परंतु, खुद्द फडणवीस यांनीच एकनाथ शिंदे यापुढे राज्याचे नेतृत्व करणार, अशी घोषणा केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्री पद का सोडले? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जात होता. त्यांनी याबाबत उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या. परंतु, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच रविवारी भाजप स्थापना दिनानिमित्त (ऑनलाईन) आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का करण्यात आले होते? याचे उत्तर दिले.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, १९५२ ला जनसंघाच्या रुपाने आपला पक्ष जन्माला आला. राष्ट्र प्रथम ही आमची शिकवण आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी सर्वाधिक भाजप आणि संघाच्या लोकांना कारागृहात टाकले. देशाचे संविधान वाचवण्यासाठी कुठलाही अपराध नसताना आमचे लोक दोन वर्ष कारागृहात राहिले. त्यानंतर देशात जनता पक्षाचे सरकार आले. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. परंतु, कम्युनिस्ट पक्ष आणि इतरांमुळे जनता पक्ष फुटला. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाची स्थापना होऊन भाजपचे सरकार आले. आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा आपण देशात सरकारमध्ये आहोत. भारताची यशस्वी घोडदौड जगातील अनेक देश आश्चर्यचकित करीत आहे. आज देशातील अनेक राज्यात भाजपचे सरकार आहे. परंतु, हा केवळ कार्यकर्त्यांचा पक्ष आले. येथे लोकशाहीलाच महत्त्व आहे असेही फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला.

म्हणून भाजपचा चहावाला पंतप्रधान होतो

भारतीय जनता पक्ष हा आज ४५ वर्षांचा झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात २०१४ ला आपल्याला स्वबळावर जनतेने निवडून दिले. आज देशातील १६ राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत असून २१ राज्यात मित्रपक्षांसोबत सरकारमध्ये आहे. असे असतानाही भाजपने लोकशाही सोडली नाही आणि घराणेशाही कधीही अंगीकारली नाही. हा पक्ष कायम कार्यकर्त्यांचाच राहिला. त्यामुळेच एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे फडणवीस म्हणाले.

शिंदेंबद्दल नेमके काय म्हणाले फडणवीस?

महाराष्ट्रात पहिल्यांदा १९९५ला युतीमध्ये राज्यात आपण सरकारमध्ये आलो. त्यानंतर पंधरा वर्षे संघर्ष केला आणि २०१४ साली पुन्हा सरकारमध्ये आलो. पाच वर्षे राज्यात आपण उत्तम काम केले. त्यानंतर लोकांनी पुन्हा निवडून दिले. परंतु, उद्धव सेनेने गद्दारी केल्याने आपले सरकार गेले. अडीज वर्षांनी पुन्हा सरकार आले. अधिक जागा असतानाही ज्यांनी आपल्यासाठी आणि हिंदुत्व टीकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा त्याग केला. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले. त्यानंतर २०२४ ला अभूतपूर्व यश मिळाले. हा भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे यश असल्याचेही फडणवीस म्हणाले.