नागपूर: रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी होता. रायगड किल्ल्यात १६७४ साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. रायगड किल्ल्याचे जुने नाव रायरी आहे. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची २९०० फूट आहे आणि या किल्ल्याला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला. या किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर आणि जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने हे दोन्ही किल्ले अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दोन्ही किल्यांवर पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन स्वराज्याचा मोठा भगवा ध्वज लावला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
हेही वाचा : महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करा? भाजप आमदाराने अखेर…
मंगळवारी विधानसभेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक मांडले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी प्राचीन स्मारकांचे जनत करावे अशी मागणी केली. तसेच देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्यांकडूनही अनेकदा वस्तूंची तोडफोड होते. यावर निर्बंध घालण्यात यावे, असेही ते म्हणाले. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. त्यानंतर आमदार शरद सोनवने म्हणाले, रायगड आणि शिवनेरी किल्ला हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. जयपूरप्रमाणे किल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी रोजगार निर्माण करावा. तसेच या दोन्ही किल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा भगवा ध्वज लावण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन शिवनेरी आणि रायगड या दोन्ही किल्ल्यांवर स्वराज्याचा मोठा ध्वज लावला जाईल.
© The Indian Express (P) Ltd