वर्धा: आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर काँग्रेस आघाडी किती जागा जिंकणार, याचा आकडा पण प्रथमच सार्वजनिक केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही आघाडी आक्रमक होण्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी महायुतीही डावपेच रचत आहे. त्याची पावती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या चालीने मिळाली आहे. काँग्रेस निष्ठावंत म्हणून वर्धा ते दिल्लीत ओळख असणाऱ्या दिवं. माजी राज्यपाल व काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभाताई राव यांच्या कन्या चारुताई टोकस यांच्यावर शिंदे गटाने जाळे फेकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांच्या विश्वासू सहकारी असलेल्या नेत्याने चारुलता यांना देवळी किंवा वर्धा विधानसभा क्षेत्रात सेने तर्फे लढा, अशी ऑफर दिली. सर्व ती मदत करू. पुढे मंत्रिपदासाठी पण तुमचा प्राधान्याने विचार केला जाईल, असेही सांगण्यात आले. खुद्द चारूलता टोकस यांनी शिंदे गटाने लढण्याची ऑफर दिली हे मान्य करीत सविस्तर भाष्य मात्र टाळले.

हेही वाचा : तिसऱ्या आघाडीची चर्चा असतानाच शरद पवार- छगन भुजबळ भेटीवर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे महत्वपूर्ण विधान…

चारूलता टोकस यांची पक्षात घुसमट होत असल्याची चर्चा सुरूच असते. त्याच खऱ्या वारसदार पण भलतेच लोणी चाखत असल्याची चर्चा देवळी परिसरात होते. प्रभाताई यांनी टाकलेला डाव आता त्यांच्याच मुलीच्या गळ्याचा फास बनल्याचे ताईंचे निष्ठावंत खुलेआम बोलतात. सर्व काँग्रेस नेते जुना संदर्भ देतात. १९९९ मध्ये राष्ट्रवादी स्थापन झाली आणि निवडणूक लागली. एकाच वेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. सर्वात मोठी अडचण प्रभाताई यांची झाली. त्या सातत्याने लढत असलेल्या देवळी मतदारसंघाचा प्रश्न उद्भवला. ताई लोकसभेच्या उमेदवार ठरल्याने देवळी विधानसभा कोणास सुपुर्द करायची असा पेच प्रभाताई यांच्यापुढे उदभवला. तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष राहून चुकलेल्या चारुलता यांना देवळीच्या उमेदवार कशा करणार, ही अडचण झाली. कारण आई व मुलगी एकच वेळी उमेदवार होणे योग्य ठरले नसते. म्हणून मग शेती पाहण्यास आलेला भाचा रणजित कांबळे यास ताईंनी देवळी सोपविली. ताई खासदार व भाचा आमदार असे लोकांनी मान्य केल्याची पावती मिळाली. तेव्हा चारूलता यांचा पत्ता कायमचा कटणार, हे ताई गटाच्या लक्षात आले नाहीच.

हेही वाचा : दुष्टचक्र कायम…दिवसागणिक एक आत्महत्या; १२० शेतकऱ्यांनी…

पुढे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी चारूलता यांना महिला काँग्रेसची विविध पदे सोपविली. २०१९ लोकसभा निवडणुकीत तिकीट पण दिले. आता चारुताईना त्यांच्या आईचा देवळी मतदारसंघ परत का देत नाही, अशी जाहीर चर्चा सूरू झाली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर म्हणतात की चारुताई सुविज्ञ्, समंजस, मनमिळावू नेत्या असल्याचे काँग्रेस व विरोधक पण मान्य करतात. त्यांनी पक्षाकडे अर्ज केल्यास वरिष्ठ ठरवतील.
चारुलता टोकस म्हणाल्या की मी काँग्रेस कधीच सोडू शकत नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde gives assembly seat offer to congress leader charulata tokas pmd 64 css