नागपूर : राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे समर्थन करत नाही मात्र ते विदेशात जातात आणि देशाच्या विरोधात बोलून बदनामी करतात. देशात राहतात तेव्हा ते काहीच बोलत नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.
गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. खोटे बोलायचे आणि ते रेटून बोलायचे असा एकच कार्यक्रम विरोधी पक्षाचा सुरू आहे. विदेशात जाऊन देशाची बदनामी करण्याचे काम केले जात आहे. आरक्षण बंद करण्याचे बोलत असतील, पण देशात कोणी आरक्षण हटवू शकत नाही आणि संविधान कोणी बदलू शकणार नाही असेही शिंदे म्हणाले.
हे ही वाचा…नागपूर : राज्यातील २८५६ कैद्यांनी धरली शिक्षणाची वाट आणि …
बुधवारी सेमीकंडक्टरच्या कंपनीचा उद्घाटन केले आहे. दोन वर्षाच्या कारकीर्दीत विविध उद्योगांशीसंबंधित पाच लाख कोटींचा सामंजस्य करार केला आहे, त्याच बरोबर स्टील उद्योग व सोलार उद्योगासह नामांकित कंपन्या येत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाचे हे सगळे आरोप दिशाभूल करण्यासाठी केले जात आहे. खोटे नेरेटीव पसरवून राज्याची बदनामी करण्याचे एकमेव काम विरोधी पक्ष करतो आहे, असेही शिंदे म्हणाले. अनेक प्रकल्प आपण करतो आणि पूर्ण केले. सगळे सकारात्मक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत खोटे बोलून त्यांनी मत घेतली आहेत, असेही शिंदे म्हणाले.
राज्यात लाडकी बहिण योजनेविरोधात काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे समर्थक अनिल वडपल्लीवार न्यायालयात गेले आहे. योजनेला मिळणारा प्रतिसाद बघता विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना माफ करणार नाही, असेही शिंदे म्हणाले.
जम्मु काश्मीरमधील ३७० कलम हटवण्या संदर्भात काँग्रेसचे नेते वक्तव्य करतात. मात्र आज ३७० कलम लागू केल्यामुळे कश्मीरमध्ये कोणीही जाऊ शकतो, फिरू शकतो आणि व्यवसाय सुद्धा करू शकतो. विरोधकांचा मात्र सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेल्या योजनेला विरोध करणे हा एकमेव कार्यक्रम सुरू असून त्यांच्या या उद्योगाचा निषेध करतो असेही शिंदे म्हणाले.