राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी विधानपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी निर्लज्ज सरकार या राऊतांच्या टीकेला उत्तर देताना त्यांचा उल्लेख पिंजऱ्यातून सुटलेला पोपट असा केला. तसेच संजय राऊत सकाळ, संध्याकाळ पत्रकारांशी संवाद साधतात या मुद्द्यावरुनही मुख्यमंत्री शिंदेंनी शाब्दिक टोलेबाजी केली.
मुख्यमंत्री शिंदेंनी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र-कर्नाटक संघर्षामध्ये लढा दिला पाहिजे असं मत मांडलं. “आपण एकत्र मिळून हा लढा लढला पाहिजे. काही लोक येतात. नवीन काहीतरी सांगतात,” असं म्हणत शिंदेंनी टीका केली. पुढे बोलताना शिंदेंनी राऊतांवर निशाणा साधला. “काही पोपट पिंजऱ्यातून बाहेर येतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरु होतात. सकाळी लोक साडेनऊपर्यंत टीव्ही लावत नाहीत. टीव्ही बंद असतो. कंटाळले लोक,” असं शिंदे म्हणाले.
राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना करत असलेल्या विधानांवरुनही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. “काय वाटेल ते बोलायचं. निर्लज्ज सरकार आहे वगैरे. अरे, निर्लज्ज तर तुम्ही आहात. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेले,” अशी टीका एकनाथ शिंदेंनी सभागृहामध्ये बोलताना केली. तसेच शिवसेना-भाजपा युतीसाठी मतं मागून तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केलं तर चुकीचं कोण असा सवालही शिंदेंनी विचारला.
नक्की वाचा >> “साहेब सध्याचे मुख्यमंत्री…”; जाहीर कार्यक्रमात पुणेकराने शिंदेंचा केलेला तो उल्लेख ऐकून राज ठाकरेंनीच कपाळाला हात लावला
“एकाबाजूला बाळासाहेबांचा दुसरीकडे मोदीसाहेबांचा फोटो लावून मतं मागितली. सरकार कुणाबरोबर यायला पाहिजे होतं? आम्ही कोणाबरोबर स्थापन केलं? मग चुकलं कोण? आम्ही का ते?” असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदेंनी उपस्थित केला.