नागपूर : उद्धव ठाकरे यांची आजवरची भूमिका विकास विरोधीच राहिली असून त्यांच्या या हटवादी भूमिकेमुळे अनेक प्रकल्प रखडले,त्याची किंमत राज्याला चुकवावी लागली. याच भूमिकेतून ते आता धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पास विरोध करीत आहेत. मात्र विकासाच्या आड येणाऱ्या ठाकरे यांना धारावीतील जनताच जाब विचारले, असे प्रत्युत्तर धारावी मुद्दय़ावर मोर्चाची घोषणा करणाऱ्या ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
धारावी प्रकल्पाची सर्व निविदा प्रक्रिया उद्धव ठाकरे सरकारच्या काळात झाली असून आम्ही केवळ विकास हस्तांतरण हक्क विक्रीत पारदर्शकता आणली आहे. पण ठाकरे यांना धारावीकरांना झुंजवत ठेवायचे आहे. गरिबांना घर मिळू नये अशीच त्यांची भूमिका असावी, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
धारावी पुनर्वसनाच्या मुद्दय़ावर १६ तारखेला अदानीच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना धारावीकर ‘मातोश्री’वर मोर्चा घेऊन गेल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे मत व्यक्त केले.
हेही वाचा >>> कारशेड मार्गी लागल्याने मेट्रोला गती; ‘लोकसत्ता शहरभान’ कार्यक्रमात डॉ. संजय मुखर्जी यांचे प्रतिपादन
‘पानसुपारीचे आयोजन करू’
बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विरोधकांसाठी पुढच्या वेळी पान सुपारी कार्यक्रमाचे आयोजन करावे लागेल, असा टोलाही त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांना लगावला.
तीन राज्यांतील पराभवामुळे विरोधकांचा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही. पंतप्रधान मोदींचा करिश्मा संपला म्हणणाऱ्यांना मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार हे जनतेने दाखवून दिल्याचे सांगितले.
काँग्रेसचे धोरण राबवण्याचे काम – सामंत
रत्नागिरी : मुंबईचा विकास व्हावा, ही शिंदे-फडणवीस सरकारची इच्छा आहे; पण पूर्वीच्या शासनकर्त्यांना आपण काही करू शकलो नाही, याचे नैराश्य आहे. त्यातूनच अदानी उद्योगसमूहाने हाती घेतलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध केला जात असून संबंधित मंडळी काँग्रेसचे धोरण पुढे चालवत आहेत, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी केली. या पुनर्विकास प्रकल्पाची निविदा अदानी समूहाला मंजूर करताना सरकारने स्वीकारलेल्या अटींबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नापसंती व्यक्त करून याविरोधात येत्या १६ डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यावर सामंत यांनी उत्तर दिले.
‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असून सर्व निकष बाजूला ठेवून आतापर्यंत १० हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आदेश दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील आर्थिक स्थिती उत्तम असून अवकाळी आणि दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देऊ. राज्याला यंदा एक लाख २० हजार कोटींचे कर्ज काढण्याची मुभा असली तरी आम्ही विविध प्रकल्प आणि योजनांसाठी ८० हजार कोटींचे कर्ज उभारणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मराठा आरक्षणावर ठाम
कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यास वचनबद्ध असून त्याबाबतची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजाने विश्वास ठेवावा असे आवाहन करताना मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाली असून न्यायमूर्ती शिंदे समिती नियमानुसार काम करीत आहे. त्यामुळे दोन्ही समाजांत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये असे आवाहन शिंदे यांनी केले. मराठा आणि ओबीसी वाद सरकार पुरस्कृत असल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळताना यामागे कोण आहे याचा लवकरच खुलासा होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
५२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या
अधिवेशनात उद्या सुमारे ५२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेवून प्रकल्पांना गती देण्यासाठी अनेक विभागांनी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात निधीची मागणी केली आहे. त्यातच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे ५ लाख २५ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून त्यापैकी दोन लाख २१ हेक्टरवरील शेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यांनाही मदतीसाठी वाढीव निधीची गरज असल्यामुळे पुरवणी मागण्या वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.