बुलढाणा: आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर जगदंबा मातेचे दर्शन घेऊन धन्य झालो. राज्यातील जनतेला सुख, समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली आहे. तसेच माता जगदंबा, आई भवानी, दुर्गा माता आमच्या विरोधकांना, ‘सावत्र भावांना’ सुबुद्धी देवो असे साकडे घातल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुरुवारी, ३ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या धावत्या दौऱ्यावर होते. मुंबईहून शासकीय विमानाने छत्रपती संभाजी नगर गाठून ते हेलिकॉप्टरने खामगाव (जिल्हा बुलढाणा) मध्ये दाखल झाले. महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान, आळंदी अंतर्गत घाटपुरी, खामगाव येथील जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज गुरुवारी करण्यात आले. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. लाडकी बहीण सारख्या योजनांमध्ये विरोधकांनी वारंवार खोडा घालण्याचा प्रयत्न केला. अगदी न्यायालयापर्यंत धाव घेतली. आम्ही केवळ लाडकी बहीणच नव्हे तर, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहे. ज्या योजना आम्ही सुरु केल्या, त्यात विरोधकांनी कितीही खोडा घातला, किंवा योजना बंद करण्याचा प्रयत्न केला, तरीही या योजना कायम सुरु ठेऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. मुळात आम्ही या योजना विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही. सामान्य महिलांना आधार व्हावा, आर्थिक सक्षमता वाढावी, त्यांच्या संसाराला हातभार लागावा या हेतूने लाडकी बहीण योजना आणल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – हत्येचा ‘धडक’ मार्ग! कारने उडविले, पत्नीचा मृत्यू, साळा गंभीर

विरोधकांना मी दोन वर्षांपूर्वी ‘खरी रणनीती’ काय असते हे चांगल्या तऱ्हेने दाखविले होते. विरोधकांनी कितीही खटपट केली तरी महायुती सरकारच्या दमदार कामगिरी आणि विविध योजनांमुळे त्यांचा युतीला हरविण्याचा ‘गेम’ माय बाप जनता उधळून लावेल असा आत्मविश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलून दाखविला. यापूर्वी नियोजित वेळेपेक्षा उशिरा दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान, आळंदी अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन आज गुरुवारी करण्यात आले.

हेही वाचा – नवरात्राच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण.. हे आहे आजचे दर…

खामगावमधील घाटपुरी येथील जय जगदंबा माता संस्थान येथे आयोजित या भूमिपूजन समारंभास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, संस्थानाचे अध्यक्ष पंकज केला, उपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टड, संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde visit to buldhana what did he pray to jagdamba mata ssb