लोकसत्ता टीम

यवतमाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी अभियानातून येत्या ३० ऑक्टोबरला यवतमाळ जिल्ह्यातील बेरोजगारांना गोड बातमी देणार आहेत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. शासन आपल्या दारी या अभियानासह जिल्ह्यातील उद्योगांसंदर्भात आढावा बैठकीनंतर स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’ हे अभियान यापूर्वी तीनवेळा जाहीर होवून पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंभर टक्के या अभियानासाठी यवतमाळ येथे येणार असून या कार्यक्रमाच्या आयोजनाची जय्यत तयारी प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी यावेळी दिली. या अभियानात यवतमाळातील बेरोजगारीसंदर्भात मुख्यमंत्री मोठा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. मात्र हा निर्णय नेमका कोणता आहे, हे सांगण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असल्याची पुष्टी त्यांनी जोडली. महाराष्ट्रातील सर्वात चांगला कार्यक्रम यवतमाळात होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आणखी वाचा-‘शरद पवारांवाबाबत मोदी एकतर त्यावेळी किंवा आता खोटे बोलताहेत’- अनिल देशमुख

औद्योगिक विकास महामंडळाने अनेक उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक वसाहतीत भाडेपट्ट्यावर भूखंड दिले आहेत. मात्र अमरावती विभागातील ७७० औद्योगिक भूखंड वापरात नाही. हे भूखंड दिल्यापासून त्या जागेवर कोणताही उद्योग सुरू झाला नाही. यवतमाळ जिल्ह्यात असे १९८ भूखंड आहेत. हे सर्व भूखंड एमआयडीसीने परत घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. नेर नजीक वटफळी येथे नवीन औद्योगिक वसाहत स्थापण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader