वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी आर्वीत विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यास आले. आर्वी हा त्यांचा अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार सुमित वानखेडे यांचा मतदारसंघ. एकाच वेळी ७२० कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. हा असा भरघोस निधी मिळाला म्हणून अनेकांच्या भुवया पण उंचावल्या. पण ते अटळ कारण आमदार वानखेडे. त्यांच्यावर विशेष लोभ असल्याचे निवडणुकी दरम्यान दिसलेच. आज परत त्याची प्रचिती आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणापूर्वी प्रस्ताविक करतांना आमदार वानखेडे यांनी आर्वीत पुढे अपेक्षित कामांचा उल्लेख करीत ते मंजूर करण्याची विनंती फडणवीस यांना केली. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून घेतली. ते म्हणाले की आमदार वानखेडे व अन्य वक्त्यांनी इतक्या मागण्या केल्यात की त्या पूर्ण करायचे झाले तर इतर म्हणतील की आमचे काय. पण आमदार वानखेडे यांचे काम उल्लेखनीय आहे. अवघ्या चार महिन्यात त्यांनी सतत विविध कामांचा पाठपुरावा केला. येथे मागणी वेळेवर करण्याआधी ते पूर्वीच कामाचा तपशील सादर करून ठेवतात. केवळ सही करायची बाकी असते. कदाचित ते माझी सही पण करून टाकतील. पण तसे करू नका. माझी वाट बघा, असे विनोद करणारे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आणि हशा व टाळ्यांचा गजर झाला. त्याच ओघात मुख्यमंत्री बोलून गेले की यापैकी एक उपसा सिंचन प्रकल्पवार मी सही करूनच ईथे आलो आहे.
उदया महाराष्ट्राचा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. ते म्हणाले, इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत आहे की भविष्यात संकट येवू शकते. म्हणून जल संधारण होणे अनिवार्य आहे. लोअर वर्धा प्रकल्पवार उडता सौर ऊर्जा प्रकल्प साकारत आहे. त्यामुळे विदर्भातील विजेची गरज भागणार. पुढील काळात राज्यातील प्रत्येक नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होणार, असे पाऊल टाकल्या जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९२७ साली स्थापन झालेल्या व आमदार वानखेडे हे माजी विद्यार्थी असलेल्या गांधी विद्यालयच्या नव्या वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले तेव्हा आमदार वानखेडे हे भारावून गेल्याचे चित्र लोकांनी टिपले.