नागपूर : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एक विडंबनात्मक कविता सादर करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. यावरून आता शिंदे गटाचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी कुणाल कामरा याचा कार्यक्रम झाला त्या हॉटेलची तोडफोड केली आहे. पोलीस आता या तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, कुणाल कामराच्या कवितेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कुनाल कामरा हा राहुल गांधी यांचे संविधान दाखवत आहेत. पण हे संविधान कुणाल कामरा आणि राहुल गांधी या दोघांनी वाचलेले नाही. कुणाल कामरा हा राहुल गांधी यांचे संविधान दाखवून वाचू शकत नाही। त्यांनी केलेल्या चुकीसाठी तात्काळ माफी मागावी असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
कुणाल कामराची कविता व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी रविवारी रात्री खार येथील द युनिकॉन्टिनेंटल मुंबई या हॉटेलवर हल्ला केला आणि तोडफोड केली. तसेच, या समर्थकांनी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्याला थेट धमकीही दिली आहे. कुणाल कामराविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यासाठी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते विविध पोलिस ठाण्याबाहेर जमल्याचं पाहायला मिळालं. द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खिल्ली उडवल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले.
आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत
युवानेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट केली आहे. “विनोदी कलाकार कुणाल कामराने जिथे एकनाथ मिंधेंवर गाणं सादर केलं तो कॉमेडी शोचा स्टेज मिंधेंच्या भ्याड टोळीने तोडला. जे गाणं १००% खरे होते”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. “एखाद्याच्या गाण्यावर फक्त एक असुरक्षित भ्याडच प्रतिक्रिया देईल”, असंही ते म्हणाले.