अकोला : शहरातील एका ६२ वर्षीय चहा विक्रेता जीवघेण्या आजाराच्या विळख्यात सापडला. घरची बेताची परिस्थिती, मालमत्ता म्हणून काहीच नाही. उपचारासाठी तब्बल १० लाखाची गरज. त्यातच मुलाचा देखील अपघात झाला. सर्वबाजूने संकटे कोसळत असतांनाच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदतीसाठी धाऊन आले. कक्षाच्या मदतीमुळे तत्काळ उपचार झाल्याने रुग्णाचे प्राण वाचू शकले आहे.
गत ४० वर्षांपासून वृद्ध गृहस्थ चहा विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. मुलाने तातडीने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर १ जानेवारी रोजी त्यांच्या मेंदूमध्ये गंभीर रक्त वाहिन्यांसंबंधी आजार असल्याचे निदान झाले. स्थानिक डॉक्टरांनी त्यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी नागपूरच्या विशेष रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा सल्ला दिला.
उपचारासाठी १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यातच दुर्दैवाने मुलाचाही अपघात झाला. या अपघातात त्याच्या पायांना गंभीर दुखापत झाली. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. अशातच शेती नाही, मालमत्ता नाही आणि उत्पन्नाचे कोणतेही निश्चित साधन नसल्याने पैशांअभावी उपचार करणे अशक्य झाले. जीव धोक्यात आला.
मदतीसाठी गरजू रुग्णाने खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संपर्कही साधला. राज्यातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे तत्काळ मदत दिली जाते.
दरम्यान, प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने रुग्णाला तातडीने मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. दुसरीकडे कुटुंबीयांनी धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. रुग्णाची आर्थिक परिस्थिती व प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.
उपचारासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची रक्कम मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, टाटा ट्रस्ट आणि सिद्धिविनायक ट्रस्ट यांच्या सहकार्यातून उभी करण्यात आली. रुग्णावर उपचार करून ते बरे झाले आहेत. आम्हाला वडिलांच्या उपचारासाठी इतकी मोठी रक्कम उभी करणे अशक्य होते. तथापी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे उपचार मिळाले व वडीलांचे प्राण वाचल्याची भावना रुग्णाच्या पुत्राने व्यक्त केली.