वर्धा : मान्यवरांसोबत स्नेहभोजन करण्याची संधी मिळण्याची बाब आनंद देणारीच. त्यातही थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत जर स्नेहभोज करण्याचे निमंत्रण मिळणार असेल तर मग पाहायलाच नको. आता तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कृत केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात असा योग येणार आहे. या उपक्रमात शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. राज्यातील १ लाख १ हजार शाळांनी आतापर्यंत सहभाग नोंदविला असून यामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साह संचारल्याचा दावा शालेय शिक्षण खात्याने केला आहे.
उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहलेले संदेश पत्र हे २ कोटी ११ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले आहे. या पत्रातून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तसेच दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ हा उपक्रम सुरू केल्याचे सूचीत केले आहे. राज्य शासनाने उपक्रमासाठी विकसित केलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. या अभियानाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे विद्यार्थ्यांना स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. विद्यार्थी व पालकांसोबतची मुख्यमंत्र्यांच्या संदेशपत्रासह सेल्फी अपलोड करणे अपेक्षित आहे. या दोन स्वतंत्र उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांमधून पुरस्कारासाठी निवड होणार आहे.
हेही वाचा…video : रानगव्याचे रौद्ररूप पाहून वाघाने ठोकली धूम! ताडोबातील झुंझीचा थरार कॅमेऱ्यात कैद
प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावरील पात्र पाच विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार मिळणार. विशेष म्हणजे पात्र विद्यार्थ्यासह त्याच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य तसेच वर्गशिक्षकास मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत स्नेहभोजन करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृद्धींगत होण्यासाठी ‘वाचन सवय प्रतिज्ञा’ मुलांना घ्यायची आहे. उपक्रमाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रतिज्ञा घ्यायची आहे. घोषवाक्य व सेल्फी या दोन उपक्रमांपैकी एका उपक्रमाचा व्हिडिओ संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. घोषवाक्य, सेल्फी व वाचन प्रतिज्ञा हे तीन उपक्रम संकेतस्थळावर १७ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अपलोड करायचे आहे. उपक्रमाची माहिती संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल अशी दक्षता घेण्याची सूचना राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी केली आहे.