नागपूर: पाच वर्षांत पूर्ण करण्याची मुदत असताना पण आठ वर्ष झाली तरी अद्याप सुरू होऊ न शकलेला नागपूर- मुंबई समृध्दी महामार्ग उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. उद्घघाटनाच्या अनेक तारखा निश्चित होऊन ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्यात आले. शनिवारी नागपूर दौ-यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महामार्गाच्या उद्घाटनाबाबत वक्तव्य केले. मात्र तारीख जाहीर न केल्याने संदिग्धता कायम आहे. मुख्यमंत्री म्हणाले, रस्त्याचे शिर्डीपर्यंत काम पूर्ण झाले असून लवकरच त्यांचे उद्घाटन होईल. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमरेड येथील कार्यक्रमात जानेवारी महिन्यात उद्घाटनाबाबत संकेत दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१४ मध्ये तत्कालालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाची घोषणा केली होती. २०१९ पर्यंत हा ७०१ किमी लांबीच्या रस्ता पूर्ण होणार होता. २०१९ मध्ये काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर राज्यात सत्तातर झाले. महविकास आघाडी सरकारने या रस्त्याचे नामकरण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग असे केले. त्याच्या उद्घघाटनाचा मुहूर्त ठरला. पण नंतर महामार्गावर पुल कोसळल्याचे कारण पुढे करून कार्यक्रम रद्द करण्यात आला. मधल्या काळात राज्यात पुन्हा सतांतर झाले.

हेही वाचा: मला मते द्या, अथवा देऊ नका, मी कामे करतच राहणार; नितीन गडकरी

ज्यांच्या खात्यांतर्गत हा प्रकल्प होता तो नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी आतापर्यंत दोन वेळा या महामार्गाचे काम शिर्डीपर्यंत पूर्ण झाल्याचा दावा केला. पण उद्घाटनाची तारीख जाहीर केली नाही. शनिवारी शिंदे भंडा-याला जाण्यासाठी नागपूरला आले तेंव्हा त्यांना समृध्दी च्या उद्घाटनाची तारीख विचारली असता त्यांनी ‘ लवकरच’ असे सांगून वेळ मारून नेली तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमरेड येथील कार्यक्रमात जानेवारी महिन्याचा मुहूर्त दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm shinde inauguration samriddhi highway would be done soon dcm fadanvis indicated would be january tmb 01