यवतमाळ : घर, भूखंडाचे कागदपत्र गहाण ठेवून अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या सावकाराविरूद्ध सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक (सावकारी) पथकाने धाड टाकली. या कारवाईत पथकाने १६१ आक्षेपार्ह दस्ताऐवज जप्त केले. नारायण बाळाभाऊ निमजवार (रा . चिरडेनगर महागाव रोड, उमरखेड) असे अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराचे नाव आहे. उमरखेड येथे आज, मंगळवारी करण्यात आलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सावकार व्याजाच्या पैशासाठी तगादा लावत होता. त्याची तक्रार श्याम तुकाराम गोसावी (रा.शिवाजी वार्ड, उमरखेड), यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे केली. अवैध सावकाराने घराचे कागदपत्रे ठेवून व्याजाने पैसे दिले होते. दिलेल्या पैशांच्या व्याजापोटी सावकार तगादा लावत असल्याने गोसावी यांनी १५ जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे तक्रार केली. त्या अर्जाच्या अनुषंगाने पडताळणीसाठी उपनिबंधक सावकारी पथकाने नारायण निमजवार याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान निमजवार याच्या घरातून आक्षेपार्ह कोरे धनादेश, कोरे मुद्रांक, खरेदी खत, नोंदी असलेल्या डायरी व हिशोबाच्या चिठ्ठ्या, अशी एकूण १६१ कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कागदपत्रांची पडताळणी करून हे प्रकरण महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार पुढील कारवाईसाठी प्रस्तावित करण्यात येणार आहे.

हेही वाचा – नागपूर : शहर बस सेवेत १५० ई- बसेस…

हेही वाचा – वर्धा : भाजप खासदार रामदास तडस यांचे एक्स खाते हॅक, पोलिसांत तक्रार दाखल

ही कारवाई जिल्हा निबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख सहायक निबंधक व्ही. के. हिरुडकर, सहायक निबंधक एस.एस.भालेराव, ए. डी. भागानगरे (महागाव), ओ.एम. पहूरकर (यवतमाळ), एस. एस. पिंपरखेडे, शिरीष अभ्यंकर, एस. एस. थोरात, संध्या पालकर,चेतन राठोड, प्रफुल चाटे आदींनी केली. या कारवाईने अवैध सावकारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Co operative department raid at umarkhed 161 documents seized from moneylender nrp 78 ssb