प्रस्ताव मुख्यालयात दाखल ल्ल पुढील अर्थसंकल्पात समावेश होणार
नॅरोगेज रेल्वेगाडी सुटणारे रेल्वेस्थानक अशी ओळख असलेल्या इतवारी रेल्वेस्थानकावर भविष्यात ब्रॉडगेज वर्दळ वाढणार असून येथे ब्रॉडगेज रेल्वे गाडय़ांच्या डब्यांची देखभाल दुरुस्तीसाठी ‘कोचिंग टर्मिनल’ विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नैनपूर, छिंदवाडा, मंडला, जबलपूर या मार्गावर सोमवारी शेवटची नॅरोगेज रेल्वेगाडी सोडण्यात आली. यापुढे मध्य भारतात नागपूर ते नागभीड ही एकमेव नॅरोगेज रेल्वेगाडी धावत राहणार आहे, परंतु नॅरोगेज बंद झाल्यानंतर यापैकी काही मार्गावर दोन वर्षांनी ब्रॉडगेज रेल्वेगाडी धावणार आहे. या गाडय़ा इतवारी किंवा नागपूपर्यंत धावतील. त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी इतवारी येथे व्यवस्था करण्याची योजना रेल्वेच्या नागपूर प्रशासनाने आखली आहे. ब्रॉडगेज रेल्वेगाडय़ांच्या डब्यांची प्राथमिक आणि द्वितीय श्रेणीतील देखभाल दुरुस्ती करण्यासाठी इतवारीला ‘कोचिंग टर्मिनल’ विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. प्रस्ताव बिलासपूर मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. आगमी रेल्वे अर्थसंकल्पात त्याचा समावेश व्हावा, यासाठी मुख्यालयाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
यामुळे नॅरोगेज रेल्वेगाडय़ासाठी वर्दळ असलेल्या या रेल्वेस्थानकावर ब्रॉडगेज गाडय़ांची वर्दळ तर वाढलेच पण त्यांची देखभाल-दुरुस्तीची सुविधा देखील होण्याची शक्यता आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर गाडय़ांची देखभाल दुरुस्ती व्यवस्था आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या इतवारी रेल्वेस्थानकावर भविष्यात अशी सुविधा असावी म्हणून प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मुख्यालयातून हा प्रस्ताव रेल्वे बोर्डात जाईल आणि पुढील अर्थसंकल्पात त्याचा समावेश होईल, अशी अपेक्षा आहे.

इतवारीतून सुटणाऱ्या गाडय़ा
रायपूर पॅसेंजर, टाटानगर पॅसेंजर, गोंदिया लोकल, दुर्ग लोकल, रामटेक लोकल, तिरोडी लोकल.
याशिवाय कुर्ला-हावडा, महाराष्ट्र एक्सप्रेस, शिवनाथ एक्सप्रेसचे येथे थांबे आहेत.

नागपूर ते मध्य प्रदेशातील विविध शहरांना जोडणारी नॅरोगेज रेल्वेगाडी आजपासून बंद होत आहे. दोन वर्षांनी या मार्गावर ब्रॉडगेज गाडय़ा धावू लागतील. त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची व्यवस्था इतवारी येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘कोचिंग टर्मिनल’चा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर जानेवारीत होणाऱ्या खासदारांच्या बैठकीत चर्चा केली जाईल.’
– अलोक कंसल,
विभागीय रेल्वे व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे.

‘कोचिंग टर्मिनल’ म्हणजे काय?
रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या गाडय़ांची देखभाल-दुरुस्तीची सोय ‘कोचिंग टर्मिनलमध्ये केली जाते. त्यासाठी येथे ‘पीटलाईन’ची सुविधा तयार केली जाते. प्राथमिक देखभाल दुरुस्ती या प्रकारात गाडीला पीट लाईनवर उभी करण्यात येते. डब्याच्या खालील नट-बोल्ट तपासणी आणि ‘ऑईलिंग व ग्रिसिंग’ केली जाते. तसेच साफसफाई केली जाते. यासाठी किमान ४ तासाचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. द्वितीय श्रेणीतील देखभाल-दुरुस्ती प्रकारात डब्यातील नादुरुस्त पंखे दुरुस्त करणे, बल्ब बदलणे आदी कामे केली जातात. यासाठी किमान एक तास लागण्याची शक्यता असते. मोठा बिघाड असल्यास गाडीतून संबंधित डबा दुरुस्ती वेगळा केला जातो. कोचिंग टर्मिनलमध्ये होणारी गाडय़ांची देखभाल-दुरुस्ती, तपासणी हा नियमित कामाचा भाग असतो.

Story img Loader