चंद्रपूर : कर्नाटक एम्टा, अरविंदो या खाजगी कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. येथील कोळसा खुल्या बाजारात विकला जात आहे. या खाणींमुळे जिल्ह्यात कोळसा माफीया सक्रीय आहे. त्यामुळे असामाजिक कृत्ये वाढली आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोळसा माफीया जिल्ह्यात सक्रीय आहे ही बाब भाजप आमदार किशोर जोरगेवार व कॉग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी निदर्शनास आणून दिल्याने खळबळ उडाली आहे. कोळसा माफियामुळेच जिल्ह्यात अवैध धंदे फोफावले आहेत अशीही टिका आमदारव्दयांनी केली आहे.

वेकोलि तसेच खासगी कोळसा खाणींचे जाळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. मात्र, त्याचे दुष्परिणामही आता समोर येत आहेत. या खाणींमुळे प्रदूषण, जनजीवनावरील परिणाम आणि गुन्हेगारीचे निर्माण झाली आहे. कोळसा खाणींच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आणि शेती व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. याबाबत अनेक तक्रारी आ. किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी लक्षात घेऊन, त्यांनी यापूर्वीच वेकोलिच्या सीएमडी यांची भेट घेऊन हा विषय उपस्थित केला होता. मात्र, ठोस कार्यवाही न झाल्यामुळे, त्यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा हा मुद्दा सभागृहात मांडला. वेकोलीच्या वतीने अधिग्रहीत केलेल्या जमिनींचा मोबदला अद्याप दिला गेलेला नाही. तसेच, उर्वरित जमिनींची खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वेकोली प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांचे पांदण रस्ते अडवले जात आहेत, याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आणि यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली.

बंराज कोळसा खाणीने वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून तिथून कोळशाचे उत्खनन सुरू केले आहे. या प्रकाराची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. जोरगेवार यांनी अधिवेशनात केली. अरविंद खाणीस विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी आणि स्थानिक जनतेच्या मागण्या ऐकून घेत ठोस निर्णय घ्यावा, अशीही त्यांनी अधिवेशनात जोरदार मागणी केली आहे .खाजगी कोळसा खाणींमुळे कोळसा माफिया सक्रिय झाला असून, अनेक ठिकाणी अवैध व्यवहार होत आहेत. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत आणि कोळसा खाणींवर निर्बंध लागू करावे असे ते म्हणाले.

रात्री कोळसा उत्खनन

कोळसा खाणीत उत्खननासाठी स्फोटकांचा मोठा वापर होतो. अरविंदो कंपनीने तीन गावांचे पुनर्वसन न करता काम सुरू केले.यामुळे लोकांच्या घराला तडे गेले आहे, या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधान सभेत उपस्थित केला. याप्रकरणी अटी शर्तीनुसार सबंधित कंपनीला पुनर्वसन बाबत निर्देश देऊ असे आश्वासन खणीकर्म मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले. अरविंदो कंपनी मार्फत रात्री देखील ब्लास्टिंग करण्यात येते, लोकं झोपू शकत नाही. या खाणीच्या कामामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या कंपनीने गावातील जिल्हा परिषदेचा रस्ता खोदून ठेवला, घरांना तडे गेले आहेत. या कंपनीचे काम बंद करायला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले पण वरून आदेश आल्यामुळे पुन्हा खाणीचे काम सुरू झाले. गावचे पुनर्वसन न करता हे काम कसे सुरू झाले? गावकऱ्यांना काही मोबदला दिलेला नाही ,त्यांना न्याय मिळणार का असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.