लोकसत्ता टीम
नागपूर : पावसाळ्यात साप निघणे ही काही नवी बाब नाही, घराच्या अंगणात, परिसरात, झाडाझुडपात अनेकदा सर्पदर्शन होते. कौलारू घरे असेल तर छतावरून तो घरात प्रवेश करतो. दाराच्या खालूनही अनेकदा साप आतमध्ये प्रवेश करतात. अनेकदा हे साप बिनविषारी असतात. पण बुधवारी नागपुरात चक्क एका घरात अतिविषारी कोब्रा साप डायनिंग टेबलवर फणाकाढून बसला आणि घरच्यांची बोबडीच वळली.
झाले असेकी बुधवारी रात्रीच्या सुमारात सर्पमित्र संतोष सोनी यांना विशाखा बागडे यांनी फोन करून त्यांच्या घरात साप दिसल्याची माहिती दिली.तो डायनिंग टेबलवर असल्याचेही सांगितले आणि तात्काळ घटनास्थळी पोहचण्याची विनंती केली. त्यानुसार सर्पमित्र संतोष सोनी हे बागडे यांच्या घरी पोहचले. घरात जाऊन पाहतो तर विषारी कोब्रा फणा काढून डायनिंग टेबलवर होता. त्याला कोणतीही इजा न करता सुरक्षितरित्या पकडणे हे सर्पमित्र सोनी यांच्यासाठी आव्हानच होते. पण त्यांनी अत्यंत कुशलतेने कोब्रा सापाला पकडले आणि सुरक्षितस्थळी सोडून दिले. त्यानंतर बागडे कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र त्याच्यातील भीती दूर झाली नव्हती.
आणखी वाचा-नागपूरः अतिक्रमण कारवाई दरम्यान तरुणाने स्वतःला पेटवले
या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनाही मिळाली. प्रत्येकजण कोब्रा घरात शिरला कसा याबाबत चर्चा करीत होते. कोब्रा सापाने दंशं केला असता तर काय झाले असते याच्या कल्पनेने बागडे कुटुंबीय भयभीत झाले होते. कोब्रारुपी आलेले संकट टळल्याचे समाधानही साप पकडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतो. यापूर्वी नागपूरच्या काही भागात एकाच घरात अनेक साप , त्याची पिल्ले आढळून आली होती. एकापाठोपाठ एक सापडलेल्या सापामुळे नागरिक घाबरले होते. पण त्याही वेळी सर्पमित्राने सर्व साप पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडले होते.
दरम्यान महापालिकेने सार्वजनिकस्थळी सर्पमित्रांचे दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध केले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावरही त्यांचे क्रमांक दिले आहे. त्यामुळे साप आढळल्यास नागरिक लगेच सर्पमित्रांना दूरध्वनी करून बोलवून घेतात. पूर्वी साप दिसला की त्याला मारले जात होते. तो निघून जावा म्हणून धूर केला जात होता. आता हे प्रकार बंद झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह महापालिकेच्या दवाखान्यातही सर्पदंशावर तत्काळ उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी लागणारे इंजेक्शन आणि इतर औषधांची तजवीज करण्यात आली आहे.
आणखी वाचा-नागपुरात एसटी कामगारांनी वाजवला ढोल… बधिर शासनाला जागे करण्यासाठी घंटीही…
नागपूरमध्ये मागील पंधरादिवसांपासून पाऊस पडत आहे. वीस जुलै रोजी काही तासात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते. अजूनही अनेक मोकळ्या जागेवर पाणी साचलेले आहे. जमिनीही ओलसर झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सर्पदर्शन होत आहे. नागरिकांनी भीती न बाळगता महापालिकेशी किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधावा,असे आवाहन महापालिकने केले आहे.
© The Indian Express (P) Ltd