नागपूर : जगातील काही देशात करोनाचे रुग्ण वाढत असतांनाच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप यापैकी एक वा अधिक लक्षणाचे रुग्ण वाढत आहे. विधान भवन परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिवेशनपासून ६५० रुग्ण आले, त्यापैकी निम्या रुग्णांमध्ये हे लक्षण होते. त्यात ३ आमदारांचा समावेश होता.
राज्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळणे व मृत्यू झालेल्या जिल्यात नागपूरचाही समावेश आहे. तर विदर्भात सर्वाधिक करोनाचे रुग्ण नागपूर जिल्यात आढळले. दरम्यान जगातील काही देशात करोनाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी हा मुद्दा पुढे येऊन तातडीने यंत्रणा सक्षम करण्याबाबत सरकारने सांगितले. दरम्यान आता विधिमंडळ परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत (गुरुवार) सुमारे ६५० रुग्ण आले. त्यापैकी निम्मे रुग्ण सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यापैकी एक वा जास्त लक्षणाचे होते. तर इतर रुग्ण रक्तदाब, मधुमेह, पोटात गडबड, अपचनसह इतर आजाराचे होते. दरम्यान तेथील डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या रुग्णांबाबतच्या आकडेवारीला दुजोरा दिला. सोबत या रुग्णांमध्ये वातावरणातील बदलामुळे वायरलची लक्षणे असून कोविडची नसल्याचे त्यांनी सांगितले. तर गरज असलेल्यांची कोविड तपासणी करत असल्याचे ते म्हणाले. एकूण विविध लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण पोलीस विभागातील असल्याचेही ते म्हणाले.