लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहेत. कधी गारठा, कधी उकाडा तर कधी ढगाळ हवामान अशी स्थिती आहे. पहाटे गारवा, सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी उकाडा, सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण अशी स्थिती राज्यात आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा थंडीत वाढ झाली असून नागपुरात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार होत असून अंशत: ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना पहाटे गारठा आणि दुपारी तीव्र उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात जवळजवळ चार अंशांनी तापमाना घसरले आहे. कोकण, मराठवाड्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत एक ते तीन सेल्सिअस इतकी अधिक तापमानाची नोंद होतेय. सध्या उत्तरेकडील राज्यात दाट धुक्याची चादर पसरली आहे. हवेत गारठा असून कोरडे थंड प्रवाह महाराष्ट्रात पसरले आहेत. परिणामी, येत्या काही दिवसात राज्यात गारठा काहीसा वाढणार आहे. तर दुसरीकडे पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारसा बदल नसून त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आणखी वाचा-बल्लारशा-चंद्रपूर मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघ ठार

हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या आसाम आणि परिसरात सक्रीय आहे. गुजरातपासून राजस्थानसह बंगालच्या उपसागरात नैऋत्य भागात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे वायव्य भारतात पश्चिमी वाऱ्यांचे झोत वाहतायत. याचाच परिणाम म्हणून थंडी कमी जास्त होत आहे. दरम्यान, राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या तीन ते चार दिवसांत कमाल तापामानात फारसा बदल होणार नाही. किमान तापमान येत्या तीन दिवसांत तीन ते चार अंशांनी कमी होणार आहे. आणि त्यानंतर हळूहळू त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा-रोशन पाटीलशी मराठीतूनच बोलले मोदी…पाच मिनिटांच्या सवांदात मुलाच्या वाढदिवसाचे…

विदर्भात येत्या दोन दिवसात किमान आणि कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून त्यानंतर तापमान दोन ते तीन अंशांनी घसरेल असे सांगण्यात आले आहे. राज्यात पुढील पाचही दिवस कोरड्या हवामानाची शक्यता असून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहत असल्याने गारठा वाढणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान काहीसे वाढले होते. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाडा सहन करावा लागला. आता तापमानात पुन्हा घट होणार आहे. राज्यात शनिवारी मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमान घसरले होते. नागपुरात सर्वाधिक कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर उर्वरित शहरात देखील तापमानात घसरण झाली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold has increased and nagpur recorded the lowest temperature rgc 76 mrj