चंद्रपूर : माजी मंत्री तथा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार व चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार या जिल्ह्यातील भाजपच्या दोन आमदारांमध्ये शीतयुद्ध भडकल्याचे चित्र आहे. मुनगंटीवार यांनी आठ मार्चला पडोली चाैकातील वाहतूक थांब्याचे (ट्रॅफिक सिग्नल) उद्घाटन केले. मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत विविध प्रश्न उपस्थित करीत आमदार जोरगेवार यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. या दोन आमदारातील वाद विकोपाला गेला असल्याने पक्षात दुफळी निर्माण झाली असून कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

पडोली चौकात वारंवार होणारे अपघात, वाढती वर्दळ आणि जडवाहतुकीच्या समस्येवर तोडगा म्हणून येथे वाहतूक थांबा सुरू करण्यासाठी माजी सैनिक मनोज ठेंगणे यांनी उपोषण केले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत मुनगंटीवार यांनी या मतदारसंघाचे आमदार नसतानाही चौकाच्या सौंदर्यीकरण व वाहतूक थांब्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर आठ मार्चला या वाहतूक थांब्याचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. मात्र या उद्घाटन कार्यक्रमावर आता जोरगेवार यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना एक पत्र पाठवून, या कार्यक्रमाचे आयोजन करताना राजशिष्टाचाराचे पालन केले होते काय?, लोकार्पण करण्याचा निर्णय कधी व कोणत्या विभागाच्या सूचनेनुसार घेण्यात आला?, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते का?, कार्यक्रमासाठी शासकीय पत्रिका छापण्यात आली होती का?, निमंत्रणपत्रिका मान्यवरांना देण्यात आली होती का?, वाहतूक थांब्याचे हस्तांतरण कोणत्या विभागाकडून करण्यात आले? थांब्याचे लोकार्पण झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तेथे वाहनांची गर्दी झाली होती का?, वाहतूक थांब्याची यंत्रणा ऑपरेट करण्याची किल्ली कोणाकडे सुपूर्द करण्यात आली?, असे विविध प्रश्न उपस्थित करीत त्याबाबत माहिती मागितली आहे. या घटनेमुळे

चंद्रपूर जिल्ह्यातील सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार या भाजपच्या दोन आमदारांमधील सुंदोपसंदी कमालीची वाढली आहे ही बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. एका वाहतूक थांब्याच्या उद्घाटनावरून दोन्ही नेत्यांमध्ये शीतयुद्ध भडकले असून भाजपमधील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे. राजकीय वर्तुळात या वादाची चांगलीच चर्चा आहे.

काँग्रेस खासदारांचीही उडी

काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही या वादात उडी घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना पत्र लिहून शासकीय निधीतून झालेल्या या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे अपेक्षित होते, असे नमूद केले आहे. भूमिपूजन व उद्घाटन सोहळा हा राजशिष्टाचाराच्या नियमांचे पालन करून व्हायला हवा. यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समज देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.