नागपूर : नागपूरसह सर्वत्र लग्न, धार्मिकसह इतरही कार्यक्रमांची रेलचेल वाढली आहे. सर्वत्र कॅनमध्ये ‘मिनरल वॉटर’ म्हणून थंड पाणी उपलब्ध केले जाते. परंतु, काही व्यावसायिक झटपट पैसा कमावण्यासाठी मिनरल वॉटरच्या नावाखाली फक्त थंड पाण्याचा पुरवठा करत असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केला आहे. या प्रकरणात शासकीय यंत्रणा मात्र ढिम्म आहे.
जवळपास सगळ्याच कार्यक्रमांमध्ये कॅनद्वारे पाण्याचे वितरण केले जाते. परंतु, ‘मिनरल वॉटर’ म्हणून उपलब्ध केले जाणारे पाणी खरोखरच शुद्ध आहे का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. बरेच व्यावसायिक या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे थंड पाणी मिनरल वॉटर म्हणून पुरवठा करत असल्याचा पंचायतचा आरोप आहे.
हेही वाचा >>> ‘वीज कर्मचाऱ्यांचे अत्यावश्यक सेवेच्या नावावर शोषण…’
प्रत्यक्षात ‘युव्ही स्टरीलायझेशन’, सूक्ष्म गाळणी व ‘ओझोनायझेशन’ इत्यादी प्रक्रिया करूनच हे पाणी कॅनद्वारे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. परंतु, गल्लोगल्ली ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली थंड पाण्याची सर्रास विक्री होत आहे. हा नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर विषय असतानाही भारतीय मानक ब्युरो, अन्न व औषधी प्रशासन विभागासह इतरही यंत्रणा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप पंचायतचे पश्चिम क्षेत्रीय संघटनमंत्री गजानन पांडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
हेही वाचा >>> आठही मतदारसंघांत चुरशीच्या लढती; दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान
प्रकरण काय?
उपराजधानीत गेल्या कित्येक वर्षांपासून समारंभ व विविध कार्यक्रमांमध्ये कॅनमध्ये २० लिटर (प्रत्यक्षात १७ लिटर) थंड पाणी भरून ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली विक्री केले जात आहे. एका कॅनची किंमत ४० ते ६० रुपयापर्यंत आहे. नागपूर महापालिका ७ ते १० रुपयांमध्ये एक युनिट म्हणजे १ हजार लिटर शुद्ध पाणी नागरिकांना पुरवते. परंतु, हे व्यावसायिक साधे पाणी थंड करून मिनरल वाॅटरच्या नावाने कोणतीही प्रक्रिया न करता ग्राहकांची लूट करत असल्याचा अ. भा. ग्राहक पंचायतचा आरोप आहे.
‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या थंड पाण्याच्या कॅनची प्रत्यक्षात किंमत किती, हे पाणी आरोग्याला उपायकारक आहे का, संबंधितांकडे विक्री परवाने आहे का, संबंधितांना परवानगी कुणी दिली या सगळ्यांची चौकशी व्हायला हवी. सोबत वेळोवेळी या पाण्याचे नमुने तपासून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाईची गरज आहे. – गजानन पांडे, पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री, अ. भा. ग्राहक पंचायत.