नागपूर : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल होत असल्याचे दिसून येत आहे. तापमानात वेगाने घसरण होत असून महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हळूहळू थंडी वाढत असल्याचे चित्र आहे.
पावसाळा संपल्यानंतर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमानात मोठी वाढ झाली होती. मागील काही वर्षांच्या तुलनेत ‘ऑक्टोबर हिट’मध्ये तापमानात प्रचंड वाढ झाली होती. मात्र, आता तापमान वेगाने कमी होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. नागपूर, पुणे, सातारा, सांगली, जळगाव, महाबळेश्वर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील तापमानात मोठी घट झाली आहे. किमान तापमान जवळजवळ १५ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत आले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा – उद्योगमंत्री उदय सामंत म्हणतात, ‘जिल्ह्यातील बेरोजगारांना मुख्यमंत्री देणार…’
हेही वाचा – मराठा आरक्षण देणारच, उदय सामंतांचे आश्वासन, म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंच्या टीका-टोमण्यांचा…’
ऑक्टोबर महिन्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर आता राज्यातील तापमान खाली आले असून वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. विभागातील अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.