नागपूर : बुटीबोरी शहर आणि एमआयडीसीला जोडणाऱ्या चौकातील उड्डाणपूल खचला असून या चौकात जडवाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.परिणामी, गावकरी, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील बुटीबोरी उड्डाणपुलास २४ डिसेंबर २०२४ रोजी तडे गेल्याचे दिसून आले. वर्धा रोड आणि बुटीबोरी एमआयडीसी जोडणाऱ्या चौकात हा उड्डाणपूल असून तो नागपूर-हैद्राबादला जोडणाऱ्या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर आहे. टी अँड टी कंपनीने बांधलेल्या १.७५ किलोमीटर लांबीच्या या पुलासाठी ७० कोटी खर्च करण्यात आले.

हा पूल वाहतुकीसाठी खुला करून साडेतीन वर्षे होत नाही तोच पुलाची अशी अवस्था झाल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. परंतु, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अद्यापही कंत्राटदारावर कारवाई केली नाही.दुसरीकडे उड्डाणपुलावरील वाहतूक चौकातून वळवण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांनी चंद्रपूर आणि वर्धेकडून नागपूरकडे येणारी जडवाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे. मात्र, जडवाहनांची वाहतूक या चौकातून होत आहे. तर नागपूरहून चंद्रपूरकडे जाणारी वाहने आगमान सावजी, गोदावरीनगरमधून बुटीबोरी बाजारात निघत आहेत. त्यामुळे गावातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

१० एप्रिलपर्यंत पुलावरील वाहतूक बंद

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंदाजानुसार, हा पूल ९ एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी चंद्रपूर आणि वर्धेकडून येणारी जड वाहने इंडोरामा, साईल ढाब्याकडून समृद्धीमार्गे वळण्यात आली आहे. मात्र, बहुतांश वाहने या वळणमार्गाचा वापर टाळत असल्याचे दिसून येते.

अनियंत्रित वाहतुकीचा बळी

या पुलावरून चंद्रपूर-वर्धा-नागपूर अशी वाहतूक होते. पूल खचल्याने या मार्गावरील जडवाहनांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तरीही वाहतूक कोंडी आणि अपघाताचे सत्र काही संपलेले नाही. त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. काही दिवसांपूर्वी याच चौकात अपघात होऊन एका कापड विक्रेत्याचा मृत्यू झाला होता.

शॉर्टकट घेणाऱ्या वाहनांचा धोका

पूल खचल्याने चौकातून पुढे जाताना वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे हा चौक ओलांडताना वेळ लागतो. हे टाळण्यासाठी नागपूरकडून चंद्रपूर आणि वर्धेकडे जाणारी वाहने सावजी आगमन, बोथली, गोदावरीनगरमधून बुटीबोरी बाजार चौकात येत आहेत. पुढे बुटीबोरीच्या जुन्या वस्तीतून चंद्रपूरकडे वाहने जातात. यामुळे गावातील रस्त्यावर अचानक वर्दळ वाढली आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर चंद्रपूर आणि वर्धेहून येणारी वाहने समृद्धी मार्गाकडे न जाता आयआटीकडून सिडको कॉलनीतून जात आहेत. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.

रस्ता ओलांडायचा कसा?

बुटीबोरी येथील शाळांमध्ये शेजारच्या गावातील तसेच सिडको कॉलनीतील मुले शिकायला येतात. त्यांना बुटीबोरी शहर आणि एमआयसीडीला जोडणारा चौक ओलांडल्याशिवाय पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराज उच्च प्राथमिक शाळा, बुटीबोरी आणि होलीक्रास कॉन्व्हेंटमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना चौकातील त्रासदायक वाहतुकीचा सामना करावा लागतो. सिडको कॉलनी, टाकळघाट, टेंभरी, सालेढाबा या गावातील नागरिकांना बुटीबोरी गावात ये-जा करण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Story img Loader