नागपूर : रस्त्यावरचे भिकारी म्हणजे कायमच उपेक्षेचा विषय. अपमान, हेटाळणी हे जणू त्यांचे प्रारब्धच. पण, नागपुरात मात्र जरा वेगळे घडले. या असाहाय्य जीवांना सन्मानाने एकत्र करुन तीर्थाटन घडवण्यात आले. नागपुरातील विविध भागातील रस्त्यावर कुणी असाहाय्य चेहरा समोर करून भीख मागतो, कुणी पाठीवर झोळीमध्ये लेकरू घेऊन रस्तोरस्ती भीख मागत फिरतो तर काही वयोवृद्ध भिखारी मंदिराच्या किंवा रस्त्यावरील फुटपाथवर भीख मागत फिरत असतात. गेल्या काही वर्षांत शहरातील विविध भागात भीख मागणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा विविध भागातील ५० भिखाऱ्यांसाठी राष्ट्रीय भिकारी मुक्त भारत अभियानअंतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
एका आलिशान गाडीत या सर्व भिकाऱ्यांना रामटेकमधील रामधामची सहल घडवून आणल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसून आला. रस्त्यावर भीक मागून जगणाऱ्यामध्ये असलेल्या मानसिकेत बदल घडवा यासाठी राष्ट्रीय भिकारीमुक्त भारत उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. त्यातील हा एक उपक्रम आहे, नागपुरातील विविध भागात भीक मागणाऱ्या ५० वयोवद्ध असलेल्या भिकाऱ्यांना एका आलिशान डबल डेकर एसी बसमधून रामटेकला सहलीसाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी त्यांना तो परिसर दाखवत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. जवळपास दोन ते अडीच तास त्या ठिकाणी वेळ घालवत सहल पुन्हा नागपुरात परतली त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसत होता.
हेही वाचा – अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
भिकाऱ्यांनासुद्धा मुख्य प्रवाहात आणावे. त्यांच्या जीवनातसुद्धा आनंदाचे क्षण यावे आणि त्यांनासुद्धा माणूस म्हणून जगता यावे यासाठीचा हा प्रयत्न असल्यामुळे हा उपक्रम संस्थेतर्फे राबविला जातो. यावेळी माजी खासदार विकास महात्मे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून बस सहलीसाठी रवाना करण्यात आली.
हेही वाचा – गोंदिया : सर्पदंशाने मायलेकींचा मृत्यू
राष्ट्रीय भिकारी मुक्त अभियानाचे संयोजक सुनील मांडवे यांनी सांगितले, भिकाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करुन त्यांना समाजात माणूस म्हणून जगता यावे यासाठी हा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविला जातो. त्यांच्या जीवनात उत्साह निर्माण करण्यासाठी आणि त्यांना समाजात चांगले जीवन जगण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर याउपक्रमामुळे वेगळा उत्साह दिसला. रस्त्यावरील भिकाऱ्यांना आपण भावनिक होऊन त्यांना पैसे किंवा काही वस्तू देतो. ही झाली अल्पकालीन संवेदनशीलता. मात्र, याच संवेदनशीलतेला आपण दीर्घकालीन संवेदशनशीलतेत रूपांतरित करू शकलो पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर भीक देण्यापेक्षा त्यांना निवारागृहांमध्ये आश्रय द्या. आपण रस्त्यावर काही देण्याची सवय लावली आहे आणि त्यांच्या अंगीही ही सवय भिनली आहे. त्यामुळे निवारागृहांमध्ये त्यांची सोय केली तर रस्त्यावरील भिकारी स्वत:हून दिवसा व रात्री निवारागृहांकडे जातील. त्यांना एकप्रकारे या निवारागृहांचे आकर्षण वाढेल. रस्त्यावर भीक मागणे सोडून ते रात्रनिवारागृहांमध्ये गेले तर खऱ्या अर्थाने त्यांचे पुनर्वसन होईल.