अकोला : जिल्हा स्तरावरील जिल्हाधिकारी हे प्रशासनातील सर्वोच्च पद. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच कार्यालयातील स्वच्छतेसाठी हातात फावडे व झाडू घेतले तर सर्वांनाच नवल वाटेल. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात तसे घडले आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता केली. निमित्त होते ते महसूल सप्ताहाचे. जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष श्रमदान अभियान राबवले.
हेही वाचा >>> जावई बापूंना चांदीच्या ताटात सोन्याचा घास, पण अनारसे देतात भलताच ताप…
जिल्ह्यात महसूल सप्ताहाचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी श्रमदानाद्वारे करण्यात आला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानात सहभागी होऊन परिसरात स्वच्छताकार्य केले. महसूल विभागामार्फत आजपासून ७ ऑगस्टपर्यंत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. सप्ताहाची सुरूवात श्रमदानातून व्हावी, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार आज अनेक अधिकारी व कर्मचारी श्रमकार्यात सहभागी झाले होते.
हेही वाचा >>> बुलढाणा : जिल्हा परिषदेत आंदोलन करणाऱ्या शाळा समिती अध्यक्षासह ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल, शिक्षणाधिकाऱ्यांची तक्रार
अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवान, जिल्हा पुरवठा अधिकारी बबन काळे, अनिल चिंचोले यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनीही स्वत: फावडे हाती घेऊन कार्यालयाच्या परिसरातील गवत काढले व परिसर झाडून काढला. इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही उत्साहाने श्रमकार्यात योगदान दिले. सफाई कार्यातून हटवलेला कचरा महापालिकेच्या वाहनाद्वारे वाहून नेण्यात आला. कोणतेही काम पूर्णत्वास जाण्यासाठी सांघिक समन्वय आवश्यक असतो. महसूल सप्ताहात अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे. नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप आदी विविध कामे करण्यात येतील. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक काम समन्वयाने पूर्ण करून हा सप्ताह यशस्वी करावा. सप्ताहातील उपक्रमांबाबत जनजागृती करून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी व त्यांना आवश्यक सेवा मिळवून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.