नागपूर : संघ आणि भाजपा कधीही अभ्यासक्रम प्रभावित करत नाहीत. जेव्हा भारतीयता, भारतीय तत्त्व, आपली सभ्यता, संस्कृती या सगळ्या गोष्टी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा पुरोगामींच्या पोटात का दुखते, असा सवाल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. सतीश चाफले यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण संस्कृतीचा ऱ्हास झाला आहे, असा गंभीर आरोप साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केला. दोन्ही मान्यवर लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान बोलत होते.

हेही वाचा – ‘वन नेशन, वन इलेक्शन’ याआधीही झाले आहे भारतात; जगात ‘या’ देशातही होतात एकत्र निवडणुका, जाणून घ्या सविस्तर…

नागपूर विद्यापीठाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात भाजपा आणि रामजन्मभूमी आंदोलनाचा झालेला समावेश आणि एनसीईआरटीकडून सुरू असलेल्या अभ्यासक्रम बदलावर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यावर डॉ. मनुघाटे म्हणाले, पाठ्यपुस्तकांमध्ये संघप्रेरित राष्ट्रवाद पेरण्याचे काम सुरू आहे. मराठी भाषेची पुस्तके वाचून विद्यार्थी संवेदनशील होतात, भावनिक होतात आणि त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो. मात्र, हल्ली भारतावर झालेले आक्रमण आणि संरक्षण हाच एकमेव विषय भाषेच्या पुस्तकात आहे. कथा, कविता न देता सतत परकीय आक्रमणाची भीती, तरुणांना दडपणाखाली ठेवणे, ‘हिंदू खतरे मे है’ असे भ्रामक चित्र निर्माण करण्याचे काम या शालेय पुस्तकातून होत आहे.

इतिहासाच्या पुस्तकात रामजन्मभूमीचा इतिहास देण्यास मुळीच विरोध नाही. ती घटना आहे. मात्र, शालेय पुस्तकातून डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत नाकारणे, वैचारिक पातळीवर मार्क्सवाद, समाजवाद, साम्यवाद देणारा कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास नाकारणे हे योग्य नाही, असेही डॉ. मुनघाटे म्हणाले. यावर डॉ. चाफले म्हणाले, सत्तेत असणारे लोक विज्ञानच मानत नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न डाव्यांकडून सुरू आहे. डार्विनच्या सिद्धांतावर आतापर्यंत जागतिक दर्जाच्या दहा वैज्ञानिकांनी आक्षेप घेतला आहे. मायकल बेव यांनी त्यांच्या पुस्तकात डार्विनचा सिद्धांत कसा चुकीचा आहे हे सांगितले आहे.

भारतीय धर्मग्रंथांवर आधारित मानवी उत्क्रांतीचा नव्याने अभ्यास व्हायला नको का? भारतीय वेद, पुराणांना तुम्ही नाकारू शकत नाही. काळानुरूप भारतीय वेद, पुराणांवर आधारित नव्या संशोधनांचा अभ्यास करायला हवा. भारतीय इतिहासाचे लिखाणच चुकीचे झाले आहे. मुघलांचा इतिहास आम्ही येणाऱ्या पिढीला का शिकवावा? नवीन अभ्यासक्रमात जर भारतीयांकडून मुघलांच्या विरोधात झालेल्या उठावाचा राष्ट्रवादी इतिहास शिकवला जात असेल तर त्याला हिंदूकरण कसे म्हणता येईल? संघ आणि भाजपा कधीही इतिहास प्रभावित करत नाही तर देशहित सर्वेतोपरी ठेवून आमचे तत्त्व, आमची संस्कृती देण्याचा प्रयत्न करतो, असे डॉ. चाफले यांनी स्पष्ट केले.

भारत हा सनातन सभ्यता शिकवणारा देश – डॉ. चाफले

काळानुरूप सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक असते. नागपूर विद्यापीठाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात झालेल्या बदलामध्ये कुठल्याही पक्षाचा इतिहास कमी केलेला नाही तर नवीन गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. १९८० ते २००० पर्यंत आंदोलनाचा इतिहास मांडला त्यात नर्मदा बचाव आंदोलनापासून आसाममध्ये झालेल्या विविध आंदोलनांचा समावेश आहे. १९८९ मध्ये रामजन्मभूमीचे आंदोलन झाले. भारतीय सनातन सभ्यता, भारतीय संस्कृती देणारा हा देश आहे. भारतात रामाचे वलय आहे. असे असताना त्यांच्या जन्मभूमीसाठी झालेल्या आंदोलनाचा इतिहास देताना लोकांच्या पोटात दुखत असेल तर हे दुर्दैव आहे, असे डॉ. चाफले म्हणाले.

हेही वाचा – नागपूर : प्रेमसंबंधातून अल्पवयीन युवती गर्भवती, प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा

बहुसांस्कृतिक लोकशाहीच्या अधिकारांना बाधा – डॉ. मुनघाटे

तरुण पिढी ही वस्तुनिष्ठ विचार करण्याऐवजी धार्मिक विचार करून अशा आंदोलनाला बळी पडत आहे. अभ्यासक्रमातून तसे विचार पेरण्याचे काम सुरू आहे. अभ्यासक्रम बदलासाठी छुप्या पद्धतीने हस्तक्षेप करणे हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे जो भारताच्या बहुसांस्कृतिक लोकशाही आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांना बाधा ठरणारा आहे, असे डॉ. मुनघाटे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comment on indian education curriculum by satish chafle and munghate in nagpur dag 87 ssb
Show comments