नागपूर : विभागीय आयुक्त कार्यालयाने नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी राबविलेल्या ‘ई-पंचनामा ॲप’ या अभिनव उपक्रमाची दखल घेत आयुक्त कार्यालयास वर्ष 2023-24 चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, नागपूर व चंद्रपूर महानगर पालिका, नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर जिल्हा परिषद आणि गडचिरोली जिल्ह्यातील नायब तहसिलदार यांना वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 चे प्रशासकीय गतिमानता पुरस्कार जाहीर झाले आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्यासाठी वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 या दोन वर्षात राज्यस्तरावर तसेच तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान” राबविण्यात आले. या स्पर्धेत सहभागी सर्व कार्यालय व अधिकाऱ्यांचे विविध निकषांवर परिक्षक मंडळाकडून परिक्षण करुन निकाल तयार करण्यात आला व 26 मार्च 2025 रोजी शासन निर्णयाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

वर्ष 2023-24 च्या स्पर्धेत विभागीय आयुक्त आणि नागपूर मनपा प्रथम चंद्रपूर मनपा आणि भंडारा जिल्हाधिकारी यांनाही पुरस्कार प्रगती अभियान व स्पर्धा 2023-24 करिता राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयांच्या श्रेणीमध्ये नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 10 लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विविध प्रकारच्या 12 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी उद्धवणाऱ्या परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी ई-पंचनामा ॲप तयार करण्यात येऊन डीबीटी द्वारे थेट मदत देण्याचा अभिनव उपक्रम राबविल्या बद्दल विभागीय आयुक्त कार्यालयास हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

महानगरपालिकांच्या श्रेणीमध्ये नागपूर महानगपालिकेने आर्थिक नियोजनासाठी विकसित केलेल्या ‘फायनान्सीयल अकाऊंटींग सिस्टिम’ करिता प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. 10 लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याच श्रेणीमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 4 लाख रूपये रोख असे या पुरस्कारचे स्परूप असून महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचा भरणा करण्याकरिता अवलंबीलेल्या विशेष पद्धतीची दखल घेण्यात आली आहे.

सर्वोकृष्ट कल्पना व उपक्रमांतर्गत शासकीय अधिकाऱ्यांच्या गटात भंडारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. चॅट बॉट प्रणालीद्वारे प्रशासकीय कार्यालये व नागरिकांना नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना देण्याच्या अभिनव उपक्रमाची दखल घेत पुरस्कारासाठी निवड झाली आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आदर्श आचारसंहिता अंमलात असल्याने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा 2023-24 चे पुरस्कार जाहिर करण्यात आले नव्हते हे पुरस्कार आज जाहीर झाले आहेत.

गडचिरोली,नागपूर आणि चंद्रपूरला पुरस्कार प्रगती अभियान व स्पर्धा 2024-25 करिता विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या श्रेणीमध्ये गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 4 लाख रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून लोकसहभागातून सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे सक्षमीकरण करण्याच्या उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे.

महानगरपालिका श्रेणीमध्ये चंद्रपूर महानगपालिकेला तृतीय क्रमांकाचा 4 लाख रूपये रोख रकमेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या महानगरपालिकेने सौंदर्यीकरण अभियान, जलाशय व पाणीसाठ्यांची स्वच्छता, शाळा इमारत नूतनीकरण, सुंदर माझे उद्यान, ओपन स्पेस स्पर्धा, रस्त्यांचे सुशोभिकरण, विविध शिल्प आदी राबविलेल्या अभिनव उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे.

सर्वोकृष्ट कल्पना व उपक्रमांतर्गत शासकीय अधिकाऱ्यांच्या गटात गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तहसिल कार्यालयाचे नायाब तहसिलदार निखील पाटील यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून 30 हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नागरिकांना तहसिल कार्यालयाच्या एकाच मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन सेवांची माहिती पुरविण्याच्या अभिनव उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे. याच श्रेणीमध्ये ‘दवाखाना आपल्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांना संयुक्तरित्या तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून 20 हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.