चंद्रपूर : नियोजनाअभावी दोन वेळा इस्रो दौरा रद्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत नवरत्न स्पर्धेसाठी निवड झालेले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने भारतीय अवकाश संशोधन केंद्र इस्रो बंगरूळ येथे दाखल झाले आहेत. २५ ते २९ एप्रिल दरम्यान शैक्षणिक दौरा आयोजित आहे. जिल्हा परिषदने वचनपूर्ती केल्याचा आनंद विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात हा दौरा आयोजित करण्यात आला असून या शैक्षणिक दौऱ्याकरीता जिल्हा परिषद शाळेतील ३२ विद्यार्थी इसरो दौऱ्याकरीता मंगळवारी रवाना झाले आहे. इस्रो दौऱ्याकरीता जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी आपले योग्य ध्येय ठरवावे, संशोधक व चिकित्सक व्हावे, परीक्षेत केवळ गुण मिळाले पाहिजे असा अट्टहास न करता एक चांगला माणूस म्हणून आपले जीवन कसे जगता येईल, यादृष्टीने प्रयत्नशील असावे, असा सल्ला दिला.
हेही वाचा >>> नागपूर : देशात ‘जीएसटी’चा प्रभाव जाणण्यासाठी कोणताही अभ्यास नाही
प्रवासाचा आनंद घ्यावा व सोबतच आरोग्य सांभाळणे अशा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना व सोबत जाणाऱ्या शिक्षकांना दिल्या. याप्रसंगी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शैक्षणिक व पर्यटनस्थळांना देणार भेटी
इस्रो (बेंगलोर) दौऱ्यादरम्यान २६ एप्रिल २०२३ रोजी बेंगलोर पॅलेस, लालबाग बॉटनिकल गार्डन, टिपू सुलतान समर पॅलेस व गव्हर्नमेंट म्युझियम, २७ एप्रिल रोजी इसरो (बेंगलोर), बेंगलोर फिल्म सिटी, जवाहरलाल नेहरू प्लॅनेटोरियम व बेंगलोर एक्वेरियम, २८ एप्रिल रोजी एचएएल एरोस्पेस म्युझियम, बनरघट्टा नॅशनल पार्क, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट तर २९ एप्रिल रोजी बेंगलोर सायन्स म्युझियम, मैसूर फॅन्टॅसी पार्क, मैसूर स्नो सिटी व मैसूर पॅलेस असे दौऱ्याचे स्वरूप राहणार आहे.