चंद्रपूर : अशैक्षणिक कामासाठी समिती स्थापन व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने १९ ऑगस्ट रोजी शासनाला पाठवलेल्या निवेदनातून केली होती. त्यावर एका समितीची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ५ सप्टेंबर रोजी राज्य शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुंबई येथे केली.
पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस हरीश ससनकर यांनी अशैक्षणिक कामासाठी समिती स्थापन व्हावी ही मागणी यासाठीच केली होती की यानिमित्ताने शासनाला समजले पाहिजे की शिक्षकांच्या मागे अशैक्षणिक कामे आहेत व ती पुष्कळ आहेत, आजवर प्रशासन शिक्षकांच्या मागे अशैक्षणिक कामे आहेत हेच मानायला तयार नव्हते. इतकेच काय तर नुकतेच सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम सुद्धा शैक्षणिक आहे, असेच आदेश देण्यात आले होते. या समितीच्या गठनामुळे शिक्षकांच्या मागे चिकटलेली सर्व अशैक्षणिक कामे पुढे येतील, शासनाच्या कागदावर येतील व समाजाला सुद्धा समजेल तसेच त्यावर कृती होऊन ती कमी होण्याची आशावाद शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.
हेही वाचा : सत्ताधारी आमदारांना पोसण्यासाठी शासनाच्या तिजोरीतून लूट, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप
कारण अशैक्षणिक कामामुळे राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षक पालक पुरते त्रासले आहेत, शिक्षकांचा शिकवण्याचा बहुमूल्य वेळ कागदोपत्री कामे, माहिती पाठवणे, अहवाल, नोंदी, मिटिंग, सर्वेक्षण, ट्रेनिंग यामध्येच निघून जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे व पालकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तसेच शासकीय शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या समितीचे लवकरात लवकर गठन व्हावे व वस्तुनिष्ठ अहवाल पुढे येऊन शिक्षकांच्या मागील सर्व अशैक्षणिक कामे कमी करावी, त्यांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, त्यांच्यावर “आम्हाला शिकवू द्या” अशी म्हणायची पाळी येऊ देऊ नका, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने केली आहे.