अमरावती : सुमारे दीडशे वर्षांपूर्वी मेळघाटच्या जंगलात पक्षी अभ्यासाची सुरुवात झाली होती. त्यानंतर वेगवेगळ्या काळात झालेल्या अभ्यासातून आजवर ३०४ पक्ष्यांची नोंद झालेली आहे. या यादीत सामान्य बाज (कॉमन बझार्ड) या पक्ष्याची नव्याने भर पडली असून हा दुर्मिळ पक्षी नुकताच मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळून आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेळघाटात नुकतेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे चार दिवसीय निसर्ग शिबीर पार पडले. यादरम्यान शिबिरात सहभागी व तज्ज्ञ मार्गदर्शक हे अकोट वन्यजीव विभागात जंगल भ्रमंतीवर असताना धारगड भागात सामान्य बाज हा दुर्मिळ पक्षी आढळून आला. पक्षी अभ्यासक तथा मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. निशिकांत काळे, बीएनएचएसचे अभ्यासक नंदकिशोर दुधे, पक्षीमित्रचे अमोल सावंत व शिबिरार्थींना हा पक्षी एका वाळलेल्या झाडाच्या खोडावर बसलेला आढळून आला. त्याचे निरीक्षण केले असता तो शुभ्रनयन तिसा या प्रजातीपेक्षा वेगळा वाटल्याने त्याचे थांबून सखोल निरीक्षण केले आणि त्याची चांगली छायाचित्रे टिपण्यात आलीत. ही या पक्ष्याची मेळघाटातील प्रथम नोंद आहे. सामान्य बाज हा भारतात हिवाळ्यात स्थलांतर करून येणारा एक दुर्मिळ पक्षी असून याच्या तुरळक नोंदी यापूर्वी मध्य भारतात व महाराष्ट्रात झालेल्या आहेत.

हेही वाचा – द्राक्षाला एकरी एक लाख मदत द्या, विधानभवनाच्या पायरीवर आमदार रोहित पवार आणि आमदार सुमन पाटील यांचे धरणे आंदोलन

हा पक्षी उत्तर पाकिस्तान व काश्मीर या प्रदेशातील रहिवासी असून तो हिवाळ्यात दक्षिणेकडे, विशेषतः श्रीलंका व केरळ राज्यात स्थलांतर करून जातो. आकाराने शुभ्रनयन तिसा या प्रजातीपेक्षा मोठा जवळपास ५५ सेंमी असलेला हा बाझ रंगाने गडद विटकरी असून छातीवर व डोक्यावर तपकिरी रंगाच्या उभ्या रेषा असतात. चोच आखूड व टोकावर काळ्या रंगाची असून डोळ्यावर काळ्या रंगाची भुवई दिसते. शेपूट आखूड व त्यावर खालून बारीक उभ्या रेषा असतात. शिकारी पक्षी गटातील या पक्ष्याचे खाद्य इतर गरुड किंवा बाजप्रमाणे लहान प्राणी, सरडे साप इत्यादी असून तो मासाहारी पक्षी आहे. सामान्य बाज प्रजातीच्या या नोंदीमुळे मेळघाटातील पक्ष्यांची यादी ३०५ इतकी झाली आहे.

हेही वाचा – गोंदिया : जिल्ह्यात यंदा ज्वारीचा बोलबाला, गव्हाला बगल

सातपुडा हा महत्त्वाचा संचार मार्ग असून या मार्गाने अनेक पक्षी स्थलांतर करीत असतात व या भागातही स्थलांतर करून येत असतात. सामान्य बाज या पक्ष्याची नोंद कदाचित त्याच्या प्रवासादरम्यान झाली असावी. हा पक्षी या ठिकाणी संपूर्ण हिवाळाभर दिसला तर या ठिकाणी तो स्थलांतर करून येत असावा, असे समजता येईल. या नोंदीमुळे सातपुडा हा स्थलांतरासाठी महत्त्वाचा संचार मार्ग असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. – डॉ. जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common buzzard a rare bird has been recorded for the first time in melghat mma 73 ssb