राज्यातील सत्तानाट्यावरून सर्वसामान्य मतदारांमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे. अकोल्यातील एका तरुणाने तोंडावर कपडा बांधून आपली ओळख लपवत थेट मतदान कार्डच विक्रीला काढले. सत्तेसाठी बंडाळी करणाऱ्या नेत्यांचा निषेध करण्यासाठी तरुणाने अनोखी शक्कल लढवली. त्याची चांगलीच चर्चा होत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी मोठी घडामोड रविवारी घडली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील मोठा गट फुटला. या फोडाफोडीच्या राजकारणावरून आरोप-प्रत्यारोपाचे वाकयुद्ध रंगले आहे. सर्वसामान्यांमध्येही त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. राजकीय घडामोडीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा >>>बुलढाणा: नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह तिघे वाहून गेले; दोघे बचावले एक बेपत्ता
सत्तानाट्याला कंटाळलेल्या अकोल्यातील एका युवकाने मतदान कार्ड विक्रीला काढले. टी शर्टवर त्याने “मतदान कार्ड विकणे,” असा मजकूर लिहित रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात संताप व्यक्त केला. यावेळी युवकाने स्वत:ची ओळख लपवून ठेवली. सत्तेच्या लालसेने घडणाऱ्या राजकीय घडामोडीवर मतदार व्यथित झाले असून त्याचा प्रत्यय युवकाच्या कृतीतून दिसून आला.