बँक, विमा क्षेत्रा संबंधित व्यवहार ठप्प   ऑटोरिक्षा चालकांच्या संपामुळे विद्यार्थी, चाकरमान्यांचे हाल  परिचारिकांच्या संपामुळे रुग्णांची परवड जिल्हाधिकारी, तहसिल कार्यालयात काम थांबले    रेल्वे, एसटी सेवेवर परिणाम नाही

केंद्र सरकार लागू करू पाहत असलेल्या कामगार कायदा सुधारणांच्या विरोधात राज्य सरकार, केंद्रीय कर्मचारी तसेच १० विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा बुधवारी सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला. बँक सेवा विस्कळीत झाली. ऑटोरिक्षा बंद राहिल्याने बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना पायपीट करावी लागली तर मुलांची शाळेत ने-आण करण्यासाठी पालकांनाच धावपळ करावी लागली. त्यातच परिचारिकाही संपावर गेल्याने शहरातील रुग्णसेवा कोलमडली.

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या राज्य व राष्ट्रीय संघटनांनी संपाची हाक दिली होती. या संपात कामगार, बँक कर्मचारी, विमा क्षेत्रातील कर्मचारी सहभागी झाले. ऑटोरिक्षा चालक संपात सहभागी झाल्याने आज विद्यार्थी, चाकरमाने आणि रेल्वे, एसटी प्रवासी आणि नियमित तपासणीसाठी जाणाऱ्या रुग्णांना चांगलाच फटका बसला.

भारतीय मजदूर संघाशी संलग्नित संघटना आणि कास्ट्राईब कर्मचारी संघटनांनी संपातून अंग काढून घेतलेअसले तरी सर्वच क्षेत्रातील बहुतांश संघटना संपात सहभागी झाल्याने कामकाजावर परिणाम झाला. विशेषत: बँकांच्या धनादेश क्लिअरिंगचे, महसूल खात्याचे, मद्यनिर्मिती, कोळसा खाण यासह इतरही क्षेत्रातील कामावर परिणाम झाला. विशेष म्हणजे ऑटो बंद असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. ऑटोरिक्षाने शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आज सक्तीची सुटी घ्यावी लागली. काही विद्यार्थ्यांना ऐनवेळी पर्यायी व्यवस्था करताना फारच कसरत करावी लागली. बाहेरगावी जाण्यासाठी  रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर जाण्यासाठी आणि रेल्वे स्थानकावरून घरी पोहण्यासाठी ऑटोरिक्षा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची पंचाईत झाली. संविधान चौक, बसस्थानक, रेल्वे स्थानक, रामबाग, गांधीबाग, इतवारी रेल्वे स्थानक येथून ऑटोरिक्षा उपलब्ध नव्हत्या. यामुळे अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला. यासंदर्भात बोलताना नागपूर जिल्हा ऑटो-चालक-मालक महासंघाचे सरचिटणीस हरिशचंद्र पवार यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करून संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला. शहरात एखाद-दुसरी अवैध ऑटोरिक्षा धावत असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

शासकीय परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे विदर्भासह शहरातील शासकीय रुग्णालयातील व्यवस्था कोलमडली आहे. या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम झाला असून, रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळाली. मेडिकल, मेयो आणि डागा रुग्णालयातील परिचारिकांनी कामावर न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा फटका विविध वॉर्डातील रुग्णाला पडला.

Story img Loader