गडचिरोली : घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अज्ञात माथेफिरूने चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली येथील बस थांब्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्याने समजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. २० फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास ‘स्प्रे पेंट’चा वापर करून अश्लील मजकूर लिहिला आहे. यावरून संतप्त झालेल्या विविध आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आष्टी पोलीस स्टेशनला धडक देत कारवाईची मागणी केली आहे.

जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहराच्या जवळ असलेल्या सोमनपल्ली या गावाच्या बस थांब्यावर शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आणि त्यापुढे अश्लील मजकूर लिहिले असल्याचे समोर आले. ही बाब वाऱ्यासारखी पसरताच विविध संघटनांनी सोमनपल्लीकडे धाव घेतली. यावेळी बस थांब्याच्या समोरील बाजूस हा आक्षेपार्ह मजकूर आढळून आला. यावेळी आझाद समाज पक्षाचे विवेक खोब्रागडे आणि कार्यकर्त्यांनी आष्टी पोलीस स्टेशनला धडक देत तक्रार दाखल केली.

येत्या काही महिन्यांवर या पारिसरातील गावात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करण्यासाठी कुणीतरी षडयंत्र रचल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला आहे. अशा महापुरुषांविषयी विकृत लिखाण करणाऱ्या आरोपीला २४ तासाच्या आत अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा विविध आंबेडकरी संघटनांनी दिला आहे. दरम्यान, आरोपीने गावातील आणखी एका भिंतीवरही अश्लील मजकूर लिहिल्याचे समोर आले आहे. या संदर्भात आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांना विचारणा केली असता त्यांनी सदर प्रकार गंभीर असून लवकरच आरोपीचा शोध घेतला जाणार असल्याचे म्हटले आहे.

…हा तर पूर्वनियोजित कट

सोमनपल्ली बस थांब्यावर लिहिण्यात आलेल्या आक्षेपार्ह मजकूरात साधारण पेंट वापरण्यात आलेला नाही. यात स्प्रे पेंटचा वापर केला गेला आहे. याचा अर्थ आरोपीने हा प्रकार थंड डोक्याने केल्याचे दिसून येत आहे. वेळ आणि जागेची निवड करतानाही हाच प्रकार दिसून येतो आहे. याचाच अर्थ समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करून जातीय दंगल घडविण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला आहे. यातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न असू शकतो. म्हणून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांनी केली आहे.

Story img Loader