महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी सहकार्य करीत नसल्याची तक्रार मिहान-सेझमधील गुंतवणूकदारांनी केली आहे.विकास आयुक्त व्ही. श्रमन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. या बैठकीला मिहान-सेझमधील सुमारे २० ते २५ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बहुतांश प्रतिनिधींनी एमएडीसीचे अधिकारी नस्ती अडवून ठेवतात. कोणत्याही कामासाठी मुंबईला नस्ती पाठवण्यात येते. नागपूरला सक्षम अधिकारी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक दिवस कामे रखडतात. एका कंपनीच्या प्रतिनिधीने तर गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी जमिनीची मागणी केली. त्यांना अद्यापही जमीन मिळाली नसल्याची तक्रार केली, असे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा >>>नागपूर: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची यंदा कसोटी, दोन वर्षांनंतर १०० टक्के अभ्यासक्रम
एकीकडे मिहान-सेझमध्ये गुंतवणूकदार येत नाही, असे चित्र असताना प्रशासन कंपन्यांना सहकार्य करीत नसल्याची बाब गंभीर आहे. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीत व्यक्त केलेला त्रागा अनेक बाबीत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे दाखवून देते. त्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार एमएडीसीचे अधिकारी ऐकून घेत नाही, अधिकारी नागपूर कार्यालयात बसत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मुंबईला नस्ती पाठवल्या जातात. या नस्ती दोन-दोन वर्षे अडवून ठेवल्या जातात. त्यामुळे कंपन्या त्रासल्या आहेत. एकीकडे कंपन्या विस्तार करण्यासाठी जमीन मागत आहेत तर एमएडीसी अधिकारी ती प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची करण्याचे काम करीत आहेत. मिहान-सेझ प्रकल्पात गायी-म्हशी सकाळ, सायंकाळ फिरताना दिसतात. त्यामुळे अनेकदा अपघात देखील झाले आहेत. या बैठकीत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी एमएडीसीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला. अधिकारी समस्यांचे समाधान करीत नाही. त्यामुळे सात-आठ महिने नस्ती इकडून तिकडे फिरत असते आणि त्यामुळे काम रेंगाळते, अशी तक्रार कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केल्याची माहिती आहे.