गडचिरोली : विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या सूरजागड लोह प्रकल्पातील एका भागीदार कंपनीने माध्यम क्षेत्रातील ‘मानबिंदू’ असल्याचे बिरुद मिरवणाऱ्या एका माध्यम समूहाच्या मालकाला गडचिरोली जिल्ह्याची ‘हवाई सफर’ घडवल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत काही प्रशासकीय अधिकारी देखील या हवाई सफरीत सहभागी झाले होते. १४ डिसेंबरला माध्यम समूहाच्या कार्यक्रमानिमित्त हे ‘माध्यम सम्राट’ गडचिरोली येथे आले होते.
एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर लोहखनिज उत्खनन सुरू झाल्यापासून जिल्ह्यात नेत्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा वाढली आहे. कोट्यवधी किमतीचे लोहखनिज दररोज विविध ठिकाणी जात असल्याने या परिसरात सर्वसामान्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे एक सुप्त संताप आकार घेऊ लागला आहे. हा संताप संकटात बदलू नये, यासाठी कंत्राटदार कंपनीकडून विविध ‘उपाय’ केले जात आहेत. कंपनीचेच काही ‘माफिया’ यंत्रणांना हाताशी धरून दडपशाही करीत असल्याचे आरोपही आता नवीन राहिले नाहीत.
अशात आता खाणीचा विस्तार होत असल्याने विनाअडथळा ही प्रक्रिया पार पाडावी यासाठी कंपनी सर्वच पर्याय वापरत आहे. त्यामुळेच १४ तारखेला ‘मानबिंदू’ असल्याचा दावा करणाऱ्या एका माध्यम समूहाच्या मालकाला या कंपनीने गडचिरोली येथे येण्यासाठी स्वामालकीचे हेलिकॉप्टर दिले. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील काही भागात हवाई सफर देखील घडवली. ही बाब उघड होताच जिल्ह्यात या माध्याम सम्राटांच्या हवाई दौऱ्याची चर्चा रंगली आहे. हा दौरा माध्यम समूहाच्या कार्यक्रमानिमित्त होता की यातून माध्यम सम्राटांनी काही लाभ पदरी पाडून घेतला, हे मात्र गुलदस्त्यात आहे.