लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा: बंडखोरीच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट) ने यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहे. बुलढाण्यात नूतन पक्ष निरीक्षकांनी जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा घेतला. तसेच जिल्हाध्यक्ष पदासाठी चाचपणी करण्यात आली.

बुलढाणा मलकापूर मार्गावरील राष्ट्रवादी भवन येथे ही आढावा बैठक पार पडली. नवनियुक्त निरीक्षक तथा प्रदेश सरचिटणीस विलास चव्हाण ( संभाजीनगर) यांनी यावेळी संघटनात्मक व बंडखोरी नंतरच्या स्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील बहुतेक पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवारांसोबत असल्याचे सांगून आमदार राजेंद्र शिंगणेंच्या निर्णयाचा फारसा फरक पडला नसल्याचे ते म्हणाले. यावेळी दत्तात्रय लहाने, बी. टी. जाधव, भास्कर काळे, अनिल बावस्कर, मोहम्मद हाफिज, साहेबराव सरदार आदी हजर होते.

आणखी वाचा-वर्धा : बुलेटला पंजाबी सायलेंसर लावणाऱ्या पोलीस अंमलदारावर कारवाई

चाचपणी अन् मुलाखती

यावेळी चव्हाण यांनी संभाव्य जिल्हाध्यक्षाची चाचपणी केली. चिखलीच्या माजी आमदार रेखा खेडेकर, प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील , बुलढाणा विधानसभा प्रमुख नरेश शेळके, संजय गाडेकर यांनी जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष पदासाठी मुलाखती दिल्या. दरम्यान निरीक्षक, जिल्ह्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सोपविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competition for the post of ncp district president in buldhana scm 61 mrj